
देशात असत्याचे राज्य आले आहे. सत्य दडपण्यासाठी लोकांचा आवाज दाबण्याचे प्रकार सुरू आहेत. जे लोक विरोधात बोलतात त्यांना दहशतवादी ठरवले जाते. प्रामाणिक लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना तुरुंगात डांबले जात आहे. ‘फेक नरेटिव्ह’ पसरवून लोकांच्या मनात भीती निर्माण केली जात आहे. लोकशाहीविरुद्ध झुंडशाही, कळपशाही सक्रिय आहे, असे सडेतोड मत व्यक्त करीत ज्येष्ठ कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला.
स्वराज्य हे अहिंसा आणि प्रामाणिकपणाने मिळवता येते, मात्र देशात, महाराष्ट्रात नेमकी उलटी परिस्थिती आहे. सत्तेच्या लालसेपोटी मतदारांचे मन कलुषित केले जात आहे. 2014 पासून हे प्रकार सुरू आहेत. सुजाण लोकशाहीविरुद्ध कळपशाही असे घटनाबाह्य राज्य केले जात आहे. काही गद्दार लोक शिवसेनेचे नाव वापरून कार्यरत आहेत, त्यांची कळपशाही आहे. देशात 2014 मध्ये सत्तेत आलेल्यांनी माध्यमांना विकत घेतले, विचारवंतांना आपल्या ताब्यात घेतले आणि जर्मनीत जे हिटलरने केले ती हुकूमशाही हिंदुस्थानात सुरू केली आहे, अशा शब्दांत अॅड. सरोदे यांनी भाजप सरकार आणि गद्दारांच्या कारस्थानाची पोलखोल केली आहे. ‘फेक नरेटिव्ह’ला जनतेने बळी पडता कामा नये, सावध राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.