
ऑनलाइन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्तीचा नफा मिळवण्याचे आमिष दाखवत एका शिक्षकाला तब्बल ७१ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा सर्व व्यवहार ‘शेरखान स्टॉक्स आयपीओ’ नावाच्या बनावट अॅपच्या माध्यमातून केल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी शिक्षकाच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील दिल्लीगेट परिसरात राहणारे शिक्षक आमेर शेख यांना गुगलवर शेअर मार्केट संदर्भात एक जाहिरात दिसली. या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लिंकवर क्लिक करण्याची सूचना होती. त्यांनी क्लिक केल्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आला. त्यानंतर त्यांना ‘शेरखान’ नावाच्या अॅपची लिंक मिळाली. या लिंकच्या माध्यमातून त्यांनी ‘शेरखान’ हे अॅप डाउनलोड केले.
दरम्यान, या अॅपची लिंक ओपन केल्यानंतर त्यांना मनोज जोशी नावाचे चेअरमन इंटरनॅशनल स्टॉक परफॉर्मन्स चॅलेंज यांना व्होट केले तर तुम्हाला शेरखान स्टॉक आयपीओ या अॅपमध्ये 30 दिवस फ्री मेंबरशिप मिळेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे आमेर शेख यांनी आयपीओ खरेदीसाठी दिलेल्या सूचनांचे पालन केले. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांवर 9 वेळा तब्बल 71 लाख रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीनंतर मिळालेला 30 टक्के नफा काढता येत नव्हता. त्यामुळे त्यांनी संबंधितांना कॉल करून मोबाईल नंबरवर संपर्क साधून माहिती घेतली. त्यावर कर्ज काढावे लागेल असे सांगण्यात आले. त्यानुसार अमेर शेख यांनी ऑनलाईन पद्धतीने 34 लाख रुपयांचे कर्ज काढले. ही रक्कम मंजूर झाल्यानंतर कंपनीच्या मोबाईल नंबरवर कॉल केल्यानंतर ‘कर्जाऊ रक्कम भरा… त्यानंतरच नफा व मूळ रक्कम विड्रॉल करता येईल’ असे सांगण्यात आले. त्यामुळे संशय बळावल्याने त्यांनी शेरखान कंपनीच्या अधिकृत कार्यालयात चौकशी केली असता, त्यांच्या नावाने असे कोणतेही अॅप नसल्याचे सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आमेर शेख यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.