Kulbhushan Jadhav कुलभूषण जाधव यांच्या अपहरणात मदत करणाऱ्या आयएसआय एजंटची हत्या

हिंदुस्थानचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) यांचे इराणवरून अपहरण करण्यात मदत करणारा आयएसआयचा एजंट मुफ्ती शाह मीर (Mufti Shah Mir) याची बलुचिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मीर हा इस्लाम अभ्यासक असल्याचे दाखवून मानव तस्करी व शस्त्रांची तस्करी सारखी कामं करायचा.

शुक्रवारी मीर जुम्म्याची नमाज अदा करायला मशिदीत गेला होता. नमाज अदा केल्यानंतर तिथून बाहेर येत असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात मीर गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं तिथे त्याचा मृत्यू झाला. मीर जमात उलेमा ए इस्लाम या संघटनेचा सदस्य होता. गेल्या आठवड्यात या पक्षाच्या दोन सदस्यांची देखील गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

हेरगिरीच्या आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेले कुलभूषण जाधव हे हिंदुस्थानचे माजी नौदल अधिकारी गेल्या आठ वर्षांहून अधिक काळ पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडले आहेत.