
सिमेंटच्या जंगलात गर्द झाडीने गच्च असलेल्या येऊरमध्ये मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ठाणेकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र येऊर गावात मुख्य रस्त्यावर बिबट्याची जोडी ‘मॉर्निंग वॉक’ करत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्यामुळे फिटनेससाठी जाणारे ठाणेकर आणि पर्यटकांना वनविभागाने अलर्ट जारी केला आहे. एक बिबट्या साधारण तीन वर्षांचा आणि दुसरा एक वर्षाचा असावा असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून प्रशासनाने खबरदारी म्हणून जनजागृती तसेच ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यास सुरुवात केली आहे.
अतिक्रमणाने अधिवास धोक्यात
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर वन परिक्षेत्रात बिबटे तसेच अनेक प्राणी, पक्षी आढळून येतात. या भागात काही आदिवासी गावपाडे आहेत. मात्र काही वर्षांपासून या परिसरात व्यावसायिकांनी अतिक्रमणे करून टर्फ, हॉटेल, ढाबे उभे केले आहेत. अनेकांनी आपले बंगले उभारल्याने वाहनांचा वावर हा मोठ्या प्रमाणात रात्री-अपरात्री सुरू झाला आहे. त्यातच निर्सगरम्य परिसरात अनेकदा हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या पार्थ्यांमुळे धांगडधिंगा सुरू असतो. या वाढत्या अतिक्रमणाने वन्यप्राण्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला असून ते मानवी वस्त्यांकडे फिरू लागले आहेत. येऊरच्या मुख्य रस्त्याला लागून एअर फोर्स कॅम्प आहे. तेथे बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुख्य रस्त्यावरून पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास दोन बिबटे जात असल्याचे दिसले. त्यामुळे येऊरमध्ये मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या ठाणेकरांनी सावधानता बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.