आम्ही चेहरे पाहून पुरस्कार देतो! भैयाजी जोशी पुन्हा बरळले…

मुंबईत राहण्यासाठी मराठी भाषा शिकण्याची गरज नाही… घाटकोपरची भाषा गुजराती…असे चिंतन करून वादाचा धुरळा उडवणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य भैयाजी जोशी यांनी काँग्रेसच्या काळात पद्म पुरस्कार खिरापतीप्रमाणे वाटले जात होते, पण आमच्या काळात पुरस्कारच चेहरे बघत येतात, किंबहुना चेहरे बघून आम्ही पुरस्कार देतो, असे म्हणत पुन्हा कलहाची ठिणगी टाकली.

मुंबईतील एका कार्यक्रमात भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेविषयी अनुदार उद्गार काढले होते. विधिमंडळातही हा मुद्दा उपस्थित झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःला मुंबईची भाषा मराठीच असल्याचे सांगावे लागले. खुद्द भैयाजी जोशी यांनीही सारवासारव करत आपल्याला तसे म्हणायचे नव्हते अशी मखलाशी केली.

आजही एमजीएम विद्यापीठात पद्मश्री पुरस्कारप्राप्त चैत्राम पवार यांच्या सत्कार सोहळ्यात भैयाजी जोशी यांनी गेल्या दहा वर्षांत सरकारच्या वतीने देण्यात येणाऱया पद्म पुरस्कार, भारतरत्न देताना चेहरे पाहिले जातात असे विधान करून गहजब उडवून दिला. काँग्रेसच्या काळात पुरस्कारांची खिरापत वाटण्यात येत होती. परंतु अलीकडे आमच्या काळात पुरस्कारच चेहरे बघत येतात, चेहरे पाहूनच आम्ही पुरस्कार देतो असे विधान त्यांनी केले. भैयाजी जोशी यांच्या या विधानामुळे केंद्र सरकार देत असलेल्या पुरस्काराचा निकष गुणवत्ता आहे का चेहरा असा प्रश्न निर्माण झाला आहे.