
सरपंच संतोष देशमुखांची हत्या ही सद्भावनेचीच हत्या आहे. अमानुषपणे हत्या करून हसणारा समाज आपण निर्माण केला आहे. एवढे आभाळ कोसळूनही देशमुख कुटुंबाने कधीही विवेक सोडला नाही, चुकीची विधाने केलेली नाहीत. त्यांनी जपलेला हा सद्भाव पुढे नेण्यासाठीच ही यात्रा असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणीच्या कारणावरून अतिशय अमानुषपणे हत्या करण्यात आली. ज्या पद्धतीने देशमुखांची हत्या करण्यात आली ते पाहून समाज हादरून गेला. आरोपींचे क्रौर्य पाहून राज्यात संतापाची लाट उसळली. सत्ता आणि पैसा यातून आलेल्या मस्तवालपणाच्या विरोधात देशमुख कुटुंब आणि मस्साजोगकरांनी पुकारलेल्या लढ्याला पाठबळ देण्यासाठी आज काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या मस्साजोग ते बीड अशा दोनदिवसीय सद्भावना यात्रेचा प्रारंभ झाला. या वेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संपूर्ण कालावधीत देशमुख कुटुंबाने दाखवलेल्या धीरोदात्तपणाचे कौतुक केले. त्यांनी जपलेली हीच सद्भावना पुढे घेऊन जाण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला.
सद्भावना यात्रा सुरू होण्याअगोदर हर्षवर्धन सपकाळ यांनी भगवानगडावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर ते नारायणगडावरही दर्शनासाठी गेले. हर्षवर्धन सपकाळ यांचा मुक्काम दत्ता बारगजे यांच्या ‘इन्फन्ट इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेत होता. मस्साजोगमध्ये आल्यानंतर सपकाळ यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या लढ्याला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर सद्भावना यात्रेला प्रारंभ झाला. या यात्रेत देशमुख कुटुंबही सहभागी झाले आहे. या यात्रेत काँग्रेस खासदार रजनी पाटील, अशोक पाटील, अतुल लोंढे, कुणाल चौधरी, रवींद्र दळवी आदी सहभागी झाले आहेत.