
मणिपुरात दोन वर्षांनंतर मुक्त वाहतूक सुरू होताच शनिवारी हिंसाचार उसळला. मैतेई, कुकी या भागात आंदोलकांनी दगडफेक करून, गाडय़ांना आग लावून वाहतूक रोखली. आंदोलकांना रोखण्यासाठी सुरक्षा दलाने त्यांच्यावर लाठीचार्ज केला तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या हिंसाचारात एका आंदोलकाचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरमधील सर्व रस्त्यांवर विनाअडथळा वाहतूक सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले होते. अडवणूक करणाऱयांवर कारवाई करण्याच्या त्यांनी सुरक्षा दलाला दिल्या होत्या. शनिवारी इंफाळ चुराचंदपूर, कांगपोक्सी, बिष्णुपूर आणि सेनापतीला जोडणाऱ्या रस्त्यावर मुक्त वाहतूक सुरू करण्यात आली तेव्हा कुकी आणि मैतेईबहुल भागात आंदोलकांनी निषेध करत दगडफेक केली व काही गाडय़ांना आग लावली. आंदोलकांना रोखण्यासाठी सुरक्षा दलाने अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, लाठीचार्ज केला. सुरक्षा दल आणि निदर्शकांमध्ये झालेल्या संघर्षात एकाचा मृत्यू तर 25 नागरिक जखमी झाले.
भूमिकेचा पुनर्विचार करा
कुकी झो कौन्सिलने शनिवारी मध्यरात्रीपासून बंद पुकारला आहे तसेच केंद्र सरकारला तणाव आणखी वाढू नये म्हणून आपल्या भूमिकेवर पुनर्विचार करावा असे आवाहन केले होते. मात्र केंद्र सरकारने हे आवाहन मोडीत काढत चुराचंदपूर आणि सेनापती येथे जाण्यासाठी इंफाळ येथून सुरक्षा दलाच्या ताफ्याच्या मदतीने बस सुरू केली, परंतु आंदोलकांनी रस्त्यावर टायर आणि खासगी गाडय़ा पेटवून देत मार्ग रोखून धरला. अशांतता टाळण्यासाठी आणि लोकांच्या सुरक्षेसाठी मूळ समस्यांचे निराकरण करणे केंद्र सरकारसाठी महत्त्वपूर्ण आहे. आम्ही बफर झोनमध्ये मैतेईच्या मुक्त हालचालीची हमी देऊ शकत नाही तसेच कोणत्याही अप्रिय घटनांची जबाबदारी घेऊ शकत नाही, असे कुकीनी निवेदनात म्हटले आहे.