महिला दिनानिमित्त शिवसेनेतर्फे दिशा पांड्या यांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभेतर्फे राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या दिशा पांडय़ा यांचा विशेष सत्कार करत पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

क्षमता असूनही कमी उंची असलेल्या लोकांना पक्षपातीपणाचा सामना करावा लागतो. असेच काहीसे दिशा पांडय़ा यांच्यासोबत घडले. कमी उंचीमुळे त्यांना तब्बल 16 वेळा मुलाखतीत रिजेक्ट करण्यात आले, पण त्यांनी हार न मानता जिद्दीने लढत मोठे यश प्राप्त केले. त्यांनी बटुत्व असलेल्या लोकांच्या मदतीसाठी ‘लिटल पिपल ऑफ इंडिया’ नावाची संस्था सुरू केली. तसेच त्यांनी 2018 मध्ये उत्तराखंडमध्ये झालेल्या पॅरा-बॅडमिंटनमध्ये राष्ट्रीय पदक जिंकले. त्या पेशाने व्यावसायिक ग्राफिक डिझायनरदेखील आहेत. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्यासारख्या कमी उंचीच्या लोकांसाठी नोकरी मेळाव्याचे आयोजनदेखील केले आहे. त्याच्या या सामाजिक कार्याची दखल घेत 26 जानेवारी 2025 रोजी त्यांचा राष्ट्रपती पदक देऊन गौरव करण्यात आला आहे.

महिला दिनानिमित्त शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांच्या वतीने दिशा पांडय़ा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विधानसभा सहसंघटक ज्योत्स्ना दिघे, शाखाप्रमुख दीपक सणस, शाखा संघटक स्वाती तावडे उपस्थित होत्या.