इतर तपासाची जबाबदारी असल्याची सबब काय सांगता? वृद्ध महिलेची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांची हायकोर्टाकडून खरडपट्टी

आमच्यावर इतर प्रकरणांच्या तपासाची जबाबदारी असल्याचे सांगत वृद्ध महिलेच्या फसवणुकीची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांची हायकोर्टाने चांगलीच खरडपट्टी काढली. इतर तपासाची जबाबदारी असल्याची सबब काय सांगता? दाद मागण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीची दखल घेणे हे पोलिसांचे कर्तव्य असून, कोणालाही माघारी पाठवणे योग्य नाही असे खडसावत खंडपीठाने पोलिसांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

गोवंडी येथील ‘डिजिटल अटक’ प्रकरणी 70 वर्षांच्या महिलेची 32 लाख रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी महिला शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गेली. त्यावेळी इतर प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी असल्याचे सांगत पोलिसांनी तिची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी महिलेने हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने पोलिसांच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केले.

पोलिसांना सुनावले खडे बोल

दाद मागण्यासाठी एखादी महिला पोलीस ठाण्यात आली तर तिची तक्रार दाखल करून घेण्याऐवजी तिच्याकडे काणाडोळा करण्यात आला, पोलिसांच्या कामाची ही कोणती पद्धत? इतर प्रकरणांची जबाबदारीचे कारण देत पोलिसांनी जबाबदारी झटकणे चुकीचे आहे.