महिलांना एक खून माफ करा, रोहिणी खडसेंची राष्ट्रपतींकडे मागणी

राज्यातील महिलांवरील वाढते अत्याचार, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची जत्रेत काढलेली छेड, एसटी बसमध्ये तरुणीवर झालेला अत्याचार यामुळे महिलांमधील असुरक्षितता वाढली आहे. महिलांचा पोलिसांवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी ‘आम्हा महिलांना एक खून माफ करा’ असे ट्विट करून समस्त महिलांच्या मनातील भावनांना वाट करून दिली आहे.

पोस्टमध्ये काय म्हटलेय

आजच्या महिला दिनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. आपला देश गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. यामध्ये शांती आणि अहिंसा प्रतीक आहे. शांतीचा देश म्हणून ओळखला जातो. राष्ट्रपती महोयदा मी क्षमा मागून एक विनंती करते की, आम्हा महिलांना एक खून माफ करावा. आज देशामध्ये मोठय़ा प्रमाणावर महिला असुरक्षित आहेत. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दोन दिवस आधीच देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱया मुंबईमध्ये बारा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला. सर्व्हेनुसार जगामध्ये महिलांसाठी सर्वात असुरक्षित असलेला देश म्हणून उल्लेख करण्यात आला आहे, असे पोस्टमध्ये नमूद करीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना टॅग केले आहे.

‘सह्याद्री’वर राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

‘शक्ती’ कायदा झालाच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी आज सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर आंदोलन केले. सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठका सुरू होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या सह्याद्रीवर थडकल्या आणि स्वसंरक्षणाचे शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट करावे, महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा प्रश्न प्राधान्याने सोडवा, अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला. या वेळी पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतले.

आज महिला दिन आहे. महिला सन्मानाबद्दल बोलले जात आहे. पण सरकारतर्फे कोणालाही महिलांच्या व्यथा ऐकायला वेळ नाही. अशा असंवेदनशील सरकारकडून काय अपेक्षा कराव्यात. – रोहिणी खडसे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष