
>> रश्मी वारंग
महाराष्ट्रात होळी आणि पुरणाची पोळी एकमेकांचा हात हातात घालून मिरवतात. तसाच उत्तरेकडचा होळीशी घट्ट ऋणानुबंध सांगणारा पदार्थ म्हणजे गुजिया. आपल्या महाराष्ट्रीय करंजीशी नातं सांगणाऱया या गोड गुजियाची ही गुजगोष्ट.
होळीचं नातं जसं रंगांशी तितकंच वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांशी. महाराष्ट्रात होळी आणि पुरणाची पोळी एकमेकांचा हात हातात घालून मिरवतात. तसाच उत्तरेकडचा होळीशी घट्ट ऋणानुबंध सांगणारा पदार्थ म्हणजे गुजिया. आपल्या महाराष्ट्रीय करंजीशी नातं सांगणाऱया या गोड गुजियाची ही गोष्ट.
गुजियाचं मूळ शोधायचं झाल्यास प्राचीन भारतामध्ये डोकवावं लागतं. प्राचीन भारतात ‘कर्णिका’ नावाचा एक पदार्थ आढळत असे. ही कर्णिका सुकामेव्याने भरलेली असायची आणि मधाने तिला गोडवा आणला जायचा. त्याच कर्णिकेचं सध्य रूप म्हणजे गुजिया. तेराव्या शतकामध्ये ही गुजिया उन्हामध्ये वाळवली जायची असा उल्लेख आढळतो. काही संशोधकांच्या मते मध्यपूर्व देशांमध्ये खाल्ला जाणारा बकलावा हा गुजियासाठी प्रेरणादायी ठरला. दोघांमध्ये वापरली जाणारी सामग्री सारखीच असली तरी स्वरूप वेगळं आहे. गुजियामध्ये वापरल्या जाणाऱया खव्यामुळे इतर कुठल्याही मिठाईपेक्षा ही मिठाई वेगळी ठरते.
उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि गुजरात ही राज्ये गुजियासाठी प्रसिद्ध आहेत. गुजिया हे जरी सुप्रसिद्ध नाव असलं तरीही वेगवेगळ्या प्रांतांत ही गुजिया वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. काही ठिकाणी ती घुगरी असते, काही ठिकाणी पेडकिया, पुरुकिया, कज्जीकायालू, सोमस, करजीकायी… अशी नावे अनेक, पण रूप मात्र एक.
फरक करायचाच झाला तर बिहारमध्ये सुकी गुजिया असते तिला पेडाकिया म्हणतात. छठपूजेत या पेडाकियाचा मान मोठा असतो. बिहारमध्ये या पेडाकिया दोन प्रकारे बनतात. सुजी अर्थात रवा आणि मैद्यापासून व खव्यापासून. रव्याच्या पेडाकियात रवा तुपावर परतून खमंग भाजून त्यात साखर, बदाम, वेलची, सुकामेवा मिसळून त्या तळल्या जातात.
सामान्यपणे गुजिया किंवा पेडाकिया बनवण्याची पद्धत समोशासारखीच असली तरी गुजिया, पेडाकिया अर्धचंद्राच्या आकाराची असते. किसलेला भाजलेला सुकामेवा, खवा, किसलेला नारळ आणि दाणेदार पोत येण्यासाठी थोडासा रवा यांच्या गोड मिश्रणाने गुजिया काठोकाठ भरलेली असते.
आता या पदार्थाचं होळीशी नातं कसं जुळलं? एकूणच होळीसारखा सण म्हणजे रंगांमध्ये भिजून बेफिकीर, बिनधास्त होण्याचा सण. गुजियाचा मिट्ट गोडपणा आपल्याला तरंगायला लावतो. गुजिया खाल्ल्यानंतर त्या गोडपणाचीच एक प्रकारे झिंग चढावी अशी आणि इतकी ती गोड असते.
त्याहीपेक्षा ज्या ज्या भागात गुजिया बनते तिथे तिथे तो एक कौटुंबिक सोहळा असतो. गुजियासाठीचं पीठ मळणं, त्याच्या आतलं सारण तयार करणं हे एका व्यक्तीसाठी जड काम ठरावे. त्यामुळे कुटुंबातल्या अनेक व्यक्ती एकत्र येऊन गुजिया बनवण्यासाठी हातभार लावतात त्यामुळेही हा पदार्थ खास ठरतो. कुटुंबाला एकत्र आणणारा ठरतो.
वातावरणात होळीचा रंग असावा. सारे जण रंगात चिंब भिजलेले असावे आणि समोर गुजियाचं भरलेलं ताट यावं. पहिला तुकडा मोडताच क्षणी आतलं मिश्रण, खवा आणि शुद्ध तुपाचा सात्त्विकपणा जिभेवर घोळला जावा. बाहेरच्या रंगांमध्ये गुजियाचा मिट्ट गोडपणा भिजत जातो आणि रंगांचा सण अधिक रंगीत, गोडमगोड होऊन जातो. तो गोडवा आणि त्याची नशा पुढचे काही तास तरी टिकवून ठेवण्याची या गुजियाची ताकद पाहून होळीचं लोकगीत आपसूक ओठांवर येतं,
खा के गुजिया पी के भंग
लगाके थोडा थोडा रंग
बजाके ढोलक और मृदंग
खेलो होली…
(लेखिका आरजे व स्तंभलेखिका आहेत.)