गुलदस्ता – जादू अशी घडे की…

>> अनिल हर्डीकर

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे लाघवी स्मित अनेक तरुणींना घायाळ करणारे… पण अंजली मेहता या तरुणीने अगदी पहिल्या नजरेत त्यला टिपले अन् ती सचिनची सौभाग्यवती झाली. अशा या गोड जोडीच्या पहिल्या भेटीचा हा गोडवा.

24 एप्रिल हा सचिन तेंडुलकरचा वाढदिवस! 1994 साली त्याचा साखरपुडा डॉ. अंजली मेहताशी ब्रीच कँडीला अंजलीच्या घरी अत्यंत साधेपणाने दोन कुटुंबांपुरता मर्यादित झाला. सचिनने त्याच्या काही मित्रांना मात्र बोलावले होते. त्यांचा विवाह झाला 24 मे 1995 या दिवशी. त्यांचे लग्न पारंपरिक पद्धतीने झाले. महाराष्ट्रीय कुटुंबातील पद्धतीनुसार सचिनच्या आईने अंजलीला हिरव्या बांगडय़ा, जोडवी आणि पैंजण भेट म्हणून दिले.

आज तुम्हाला मी सांगणार आहे ते त्यांची पहिली भेट कुठे आणि कशी झाली ते… स्वत सचिनने त्या आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत `प्लेइंग इट माय वे’ या पुस्तकात. अंजली आणि सचिन या दोघांच्या कौटुंबिक वातावरणात कमालीचे अंतर होते. अंजली ही अर्धी गुजराती आणि अर्धी इंग्लिश. लग्नापूर्वी ती दक्षिण मुंबईतल्या एका सुखवस्तू कुटुंबात राहत होती. सेंट झेवियर्सची ती विद्यार्थिनी होती. नंतर जे. जे. हॉस्पिटलमधून तिने वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला. तिचे बोलणे छान, मनमोकळे असायचे. घरात किंवा बाहेर वावरताना ती सर्रास पाश्चिमात्य पद्धतीचा पेहराव करत असे. त्याच्या अगदी उलट सचिनच्या राहण्याची पद्धत. ािढकेटपटू मित्र आणि ािढकेट एवढंच सचिनचे विश्व होते. असे असताना या दोघांची भेट होणे हे विधिलिखित होते. त्याचे झाले असे…

14 ऑगस्टला ओल्ड ट्रफर्डला इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात सचिनने त्याचे पहिले शतक झळकवले. त्या वेळी अंजली तिच्या आई-वडिलांबरोबर इंग्लंडमध्ये होती. तिचे वडील आनंद मेहता उत्तम ब्रिज खेळत. ब्रिज स्पर्धेत त्यांनी राष्ट्रीय विजेते पद मिळवलेले होते. शिवाय ािढकेटवर त्यांचे अतोनात प्रेम होते. अंजलीला त्यांनी सचिनची चाललेली बॅटिंगची झलक बघायला बोलावले. अंजलीला ािढकेटमध्ये काडीचाही रस नव्हता. तिने काही ती मॅच पाहिली नाही. नंतर ती लगेच भारतात परतली. सचिन इंग्लंडहून आला त्याच दिवशी अंजलीची आई भारतात येत होत्या म्हणून त्यांना न्यायला अंजली विमानतळावर आली होती आणि तिथेच त्याच वेळी बॅग्ज ताब्यात घेण्यासाठी वाट पाहात उभ्या असलेल्या एका सुंदर, आकर्षक तरुणीकडे सचिनचे लक्ष गेले. बाहेरच्या गॅलरीत ती उभी होती. तीही सचिनकडेच पाहात होती. अंजली मैत्रीण डॉ. अपर्णा संथानसोबत तिथे आली होती.

अंजली आणि सचिनची क्षणभरच नजरानजर झाली. त्यानंतर ती दिसेनाशी झाली. सचिन विमानतळाच्या बाहेर पडत असताना त्या दोघीजणी सचिनला पुन्हा दिसल्या. सचिनने अंजलीला चटकन ओळखले. तिने नारिंगी रंगाचा टी-शर्ट आणि निळी जिन्स असा पोशाख केला होता. दरवाजाच्या बाहेरून ती सचिनच्या मागोमाग पळत होती. ती सचिनचा पाठलाग करत होती. एवढेच नव्हे तर ती त्याच्याकडे पाहून मोठय़ाने ओरडत होती… “तो बघ… कित्ती गोड आहे!” सचिन लाजेने चूर झाला. त्याला काय करावे तेच सुचेना. बाहेर सचिनचे भाऊ अजित आणि नितीन सचिनची वाट बघत उभे होते. सचिनचा बालमित्र सुनील हर्षे त्याच्यासोबत होता. तो सचिनच्या कानात पुटपुटला… “ती बघ, एक चिकनी मुलगी तुला हाका मारतेय, तुला भेटायला वेडी झालीये.”

सचिनने तिला आधीच पाहिलं होतं आणि पहिल्याच नजरेत ती सचिनच्या मनात भरली होती. विमानतळावरून घरी गेल्यावर `आज मला माझा भावी नवरा भेटला’ असे तिने थट्टेत आपल्या आई-वडिलांना सांगून टाकले.

पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगाची जादू अशी घडे ही या दोन लोचनांची…