
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
`सेपरेशन अँझायटी डिसऑर्डर’ या विकारात मनातून खचून जाणे, अति चिंता, अति विचार या गोष्टी वारंवार घडत राहतात. सतत भीती, प्रचंड अगतिकता, भयंकर चिंता, दुबळेपणाची असणारी भावना आणि आत्मविश्वासाची कमतरता आणि यामुळे येणारे हळवेपण यातून बाहेर पडण्यासाठी समुपदेशन योग्य ठरते.
सागरची (नाव बदलले आहे) नोकरी सोडण्याची ही चौथी वेळ होती. जवळपास दोन आठवडय़ांत त्याने मॅनेजरला ई-मेल केला होता. त्यात त्याने नोकरी का सोडतोय, याचे कारण जवळजवळ एक पान लिहिले होते. घरी आल्यावर तो आपल्या खोलीत गेला आणि कपडे न बदलता तसाच पलंगावर आडवा झाला. तेव्हाच त्याच्या वडिलांनी ताडले होते, “सागर, बाळा काय झालं?” त्यांनी मायेने विचारले असता त्याचा बांध फुटला आणि पंचवीस वर्षांचा सागर हमसाहमशी रडायला लागला. “जॉब नाही करायचा का?” वडिलांनी त्याची चलबिचल जाणलेली होतीच. बाबांच्या शब्दांनी त्याला पुन्हा भडभडून आले. “तुम्ही विचारणार नाही का? हा जॉब मी का सोडतोय?” सागरने न राहवून त्यांना विचारले. सागरच्या आईबाबांनी त्यावेळी शांत राहायचे आणि काहीच न विचारण्याचे ठरवले. सागरच्या या धरसोड वृत्तीला दोघेही कंटाळले होते. ही त्याची वृत्ती फक्त नोकरीपुरतीच मर्यादित नव्हती तर उच्च शिक्षणाच्या संधीही त्याने अशाच सोडल्या होत्या. आधी एमबीएमध्ये दोन महिने, नंतर अॅनिमेशनचा कोर्स तीन आठवडे, त्यानंतर शॉर्ट टर्म कॉम्प्युटर कोर्स कसाबसा त्याने पूर्ण केला. त्यातही त्याने परीक्षा दिलीच नव्हती. पण त्याच्या वडिलांच्या मित्राच्या ओळखीने त्याला निदान सर्टिफिकेट तरी मिळालं (मॅनेज केले) होते आणि त्यानंतर नोकरी. सुरुवातीला तीन ठिकाणी तो महिन्याच्या वर टिकलाच नव्हता. आताही त्याने तेच केले होते. शेवटी त्या दोघांनीही सागरला समुपदेशनासाठी नेण्याचे निश्चित केले.
“हो! जाऊ या आपण. मला पण काही प्रश्नांची उत्तरं हवीच आहेत.” सागर म्हणाला. लागलीच ते तिघेही सत्राला आले. सुरुवातीला सागरच्या आईने त्याच्या स्वभावाबद्दल आणि त्याच्या धरसोड वृत्तीबद्दल सांगितले. “तो टिकत नाही म्हणण्यापेक्षा त्याचा लगेच कॉन्फिडन्स जातो आणि तो हार मानूनच परत येतो. मग नंतरचे काही दिवस हे त्याला समजावण्यातच जातात.” ती सांगत होती. सागरच्या बाबांनीही तिला दुजोरा दिला. “खरं म्हणजे तो कधीही पॉझिटिव्हली कुठल्याही आव्हानाला सामोरा गेलेलाच नाही. त्याला कायम कुठली तरी भीती असते आणि या भीतीमुळेच तो पुढे पाऊल टाकायला कचरतो.” ते सांगत होते. दोघांनीही आपल्या परीने सागरची मानसिक स्थिती सांगितली.
नंतर ते दोघे केबिनबाहेर बसले आणि सागरने त्याच्याबद्दल सांगायला सुरुवात केली. मात्र लगेच तो रडायला लागला. “मॅम, मला खरंच मरावंसं वाटतंय. मी खूप प्रयत्न करतो की, घाबरून जाऊ नये म्हणून, पण कच खातो.” तो रडतच होता. “कधीपासून तुला आत्मविश्वास गमावल्यासारखा वाटतोय?” असे त्याला विचारताच तो उत्तरला, “आत्मविश्वास गमावण्यासाठी तो असावाही लागतो ना! मला तर लहानपणी कधीच आत्मविश्वास वाटला नव्हता. शाळेत कधीही मी उत्साहाने गेलेलो नाही. कायम डोक्यावर टेन्शन असायचं. मला नाही जमलं तर?” सागर सांगत होता. नंतर बोलताना त्याने हेही सांगितले की, करायचे म्हणून त्याने शाळा पूर्ण केली. पण नंतर कॉलेजमध्ये त्याने बऱयाचशा बंक्स मारल्या होत्या आणि घरी राहून अभ्यास केला होता.
“घरीच का राहावंसं वाटायचं तुला?” या प्रश्नावर सागर एकदम शांत झाला, पण पटकन म्हणाला, “आईबाबा होते घरी. बाबांनी नुकतीच रिटायरमेंट घेतली होती आणि आम्ही तिघे मस्त मजा करायचो.” सागरला आईबाबांच्या समवेत खूपच सुरक्षित वाटायचे आणि ते दोघेही त्याचा `कम्फर्ट झोन’ झाले होते. एकुलता एक असल्यामुळे त्याचे फाजील लाड जरी नव्हते झाले, पण त्याला प्राणापलीकडे जपले गेले होते, पण हेच जपणे आता कुठेतरी तिघांनाही मारक ठरले होते. कारण सागर दोघांनाही सोडून कुठेही जायला किंवा राहायला तयार होत नव्हता. त्याला एकदम मानसिकरीत्या पंगू झाल्यासारखे वाटायचे, घाबरायला व्हायचे आणि कधीतरी पॅनिकही झाल्यासारखे वाटायचे. मी त्याला विचारले, “पण स्वतचं करीअर तर बघावं लागेल ना तुला?”
“मला आईबाबांना सोडून कुठेही परदेशात स्थिर व्हायचं नाही.” बोलता बोलता सागर पटकन मनातला सल बोलून गेला आणि तिथूनच त्याच्या समस्येची आणि पुढच्या उपचारांची दिशा स्पष्ट झाली. सागरला `सेपरेशन अँझायटी डिसऑर्डर’ या विकाराची समस्या होती. ती बहुधा त्याला लहानपणापासूनच असावी हे त्याच्या बोलण्यातून आणि त्याच्या पालकांशी चर्चा केल्यानंतर जाणवले. या समस्येमुळे सागर मनातून खचला होता आणि आईवडिलांची अति चिंता (माझ्या आईबाबांना काही झालं तर), अति विचार (मी आईबाबांशिवाय काहीही करू शकत नाही) या दोन गोष्टींमुळे अधिकाधिक नैराश्याच्या गर्तेत अडकत चालला होता.
“तुला ही भीती का वाटते?” असे विचारल्यावर तो म्हणाला, “मी एकदा प्रवास करताना तरुण मुलाचा अपघात बघितला. ट्रेनच्या खाली आलेला तो. त्या वेळेपासून मला ही भीती बसली.”
सागरच्या पालकांनाही याबद्दल विचारले असता त्याची आई पटकन म्हणाली, “मला पण ऐकून त्या वेळी कसंतरीच झालं. म्हणून मीच याला सांगितलं की, तू आता ट्रेनने न जाता बस किंवा ऑटोने जा.” सागरची त्याच्या आईने घेतलेली अति काळजी या वाक्याद्वारे कळून आली. त्याच्या वडिलांनीही त्याला गरजेपेक्षा जास्त सांभाळले होते. त्याला पाचेक मिनिटे जरी उशीर झाला तरी त्यांची त्याला फोनाफोनी चालू व्हायची. या सर्व गोष्टींमुळे सागर कधी स्वत धीट बनू शकला नाही आणि कायम पालकांच्या पंखांखाली राहिला, पण जेव्हा त्याच्या वयाचे त्याचे मित्र आपापल्या करीअरमध्ये जायला लागले तेव्हा साहजिकच सागर त्यांची आणि स्वतची तुलना करून अधिकाधिक ताणात राहायला लागला. एकावेळी सागरला त्याच्या पालकांपासून दूर राहायचे नव्हते. त्यामुळे तो ज्या-ज्या नोकरीच्या ठिकाणी बाहेरगावी जाण्याच्या संधी असत, त्या-त्या नोकऱया क्षुल्लक कारणांमुळे सोडून देई, पण हे सगळे करताना तो भयंकर ताणातून जाई. कारण अशा संधी पुन्हा कदाचित त्याला मिळणार नव्हत्या. (ज्याची त्याला कल्पना होती) प्रचंड अगतिकता, भयंकर चिंता, दुबळेपणाची असणारी भावना आणि आत्मविश्वासाची कमतरता या सगळ्या कारणांमुळे तो कमालीचा हळवा झाला होता.
सागरचा गेलेला आत्मविश्वास त्याला मिळवून देणे हे जसे आव्हान होते तसेच त्याला पालकांबाबतच्या अति चिंतेपासून मोकळे करणेही तितकेच महत्त्वाचे होते. हीच गरज त्याच्या पालकांचीही होती. त्यांनाही स्वतच्या मुलाच्या अति संगोपनापासून मोकळे करणे गरजेचे होते. `चिंता आणि भीती (अनामिक) तिघांनाही व्यापून होती. त्यासाठी त्याच्याबरोबर पालकांचीही काही सत्रे घेतली गेली, ज्यामध्ये तिघांच्याही मानसिक असुरक्षिततेच्या विचारांवर काम सुरू झाले. त्यात असे की, त्यांचे मुंबई उपनगरात कोणीही नातेवाईक नव्हते. त्यामुळे `आपण तिघेच एकमेकांसाठी आहोत’ या धारणेने तिघेही एकमेकांमध्ये गरजेपेक्षा जास्त गुंतले होते आणि यातूनच सागरची मानसिक समस्या सुरू झाली होती. स्वतची स्पेस आणि दुसऱयाचीही स्पेस कशी सांभाळावी? मनात चाललेले भीती आणि चिंतेचे विचारपा कसे भेदावे? असुरक्षितता, नकारात्मकता यासारख्या भावना वास्तविकतेच्या पातळीवर कशा हाताळाव्यात यासंबंधीही त्यांची सत्रे चालू झाली.
यथावकाश त्या तिघांमध्ये फरक दिसून येतोय. सागर थोडा थोडा मोकळा होतोय. त्याच्यात होणारा बदल येणारा काळच ठरवेल.