
>> दीपराज
`गो दीपल्या, तुजो संजोमामा खय हा गो…
`आसतीत खय तरी त्या वाडेकरांबरोबर गजाली साठीत चायच्या टपरेर नायतर पानाच्या गादयेर…’
`गजालीन घोव खाल्ल्यान’ अशी एक मालवणीत म्हण आहे. पण अशा गजाली साठता साठताच त्यानिमित्ताने का होईना, संवाद साधला जातो. माणसं घडली जातात, घडवली जातात.
काही माणसं इतिहास घडवतात, इतिहास होतात. प्रकाश सरवणकरांची मालवणी माणसं मात्र `गजाल’ होतात. मालवणी मुलखात ती इथे तिथे कुठेही भेटत राहतात. व्यावहारिक मराठी आणि मालवणी बोली या दोन्ही भाषांमधल्या सरवणकरांच्या कथांचा संग्रह म्हणजे मराठी वाचकांसाठी एक खुमासदार मेजवानी आहे. वैशालीताई पंडित यांनी लिहिलेली पुस्तकाची प्रस्तावना वाचून या पुस्तकातील शब्दखजिना वाचायची उत्सुकता अगदी खवळून येतेच. प्रकाश सरवणकर हे तर हाडाचे जन्मजात मालवणी. मालवणी माणूस, त्याच्या स्वभावातले फणसगुण, नदीचा खळाळता स्वभाव, माडाचा ताठपणा तसाच लव्हाळय़ाचा नम्रपणाही त्याच्याकडे असतो. या संग्रहातील कथा प्रातिनिधिक आहेत.
अगदी एकाहून एक थक्क करणारे इरसाल नमुने तुम्हाला इथे जागोजागी भेटतात. `गजाल आवळय़ांची’ ही कथा वाचताना सुरुवातीला लेखकाने केलेलं तेव्हाच्या भीषण गरिबीचं वर्णन… `कुल्यार फाटत इलेले खाकी पॅण्टी’ हे वास्तव लक्षात येतंच. `शिमग्याची गजाल’ वाचताना गावच्या परंपरा, रीतीरिवाज याचं अगदी सविस्तर आणि चपखल वर्णन लेखकाने केलं आहे. मांडार नाचणारी कोळीण, घुमटावर पडणारी थाप, नाचणारी सोंगं, लावलेलं आख्यानयुक्त फाग खूपच सुंदर. हे सगळं मुळातूनच वाचायला हवं. `आये’ या दोन अक्षरांची जादू काय असते हे `आये’ कथा वाचल्यावरच लक्षात येते. घनदाट झाडी, जंगल, खाडी, समुद्रकिनारा यांच्या अंगाखांद्यावर खेळलेला लेखक… लाल पाटीचे मुठये कुरले, कापारसून पळणारे सरपोळे कुरले, ल्हावे-कवड्यांचा मटान, लांडोर भेकरांची सागुती, शेंगाळ्याची कवटा ह्या सगळा लेखकानं प्वॉट फुटासर खालेला आसा… आणि अश्यो ह्यो सुंदर, हसवणाऱ्यो मालवणी…मराठी गजाली लयच चांगल्या प्रकारान मांडल्यान हत.
मालवणी आणि मराठीला लेखक पाठीला पाठ लावून आलेल्या भगिनी म्हणतात. त्याचा प्रत्यय हे पुस्तक उघडून मिटले किवा मिटून उघडले तरी येईल. `आवेग’, `घुसमट’ यांसारख्या कथांतून विधवा किंवा अपंग स्त्रीची शारीरिक भूक किती प्रखर असते आणि तिचे दमन नव्हे, तर शमन होणे आवश्यक आहे, नाहीतर मनोरुग्ण वाढतील हे लेखक धीटपणे मांडतो. सोशल मीडिया जेवढं चांगलं तेवढंच ते वाईटही असतं. `आाानलाईन’च्या आहारी गेलं तर कधी ना कधी त्याची जबर शिक्षा मात्र `ऑफलाईन’ भोगावी लागतेच. जातीयवाद माणसाला कसा आयुष्यातून जिवानिशी उठवतो हे सांगणारी, झाड हा निवेदक असणारी `एक झाड दोन पक्षी’ कथा काळीज कापत जाते. `खुदा का बंदा’, `वारस’ या कथा माणुसकीचा ओलावा दाखवणाऱ्या आहेत. `एखाद्याच्या चेहऱ्यावर जाऊ नये, कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो’ हे मर्मग्राही विवेचन `काय भुललासी’ ही गजाल वाचताना समजतेच. भयकथाही अगदी सहजरीत्या लेखकाने हाताळलीय हे `भूक’ ही कथा वाचताना जाणवतेच. या पुस्तकातली `अखेरचा श्वास’ ही कथा वाचताना तर अक्षरश डोळे नकळत वाहू लागतात. नर्स आणि डाक्टर यांचं फुलत जाणारं प्रेम, नातं… प्रेम मोठं की कर्तव्य मोठं यात होणारी तिची घुसमट, तडफड हे वाचताना मन अगदी पार गलबलून जातं. प्रत्येक गजाली-कथेबरोबर लेखक तारतम्याने सोबत आहे. म्हणूनच या गजालींतला लेखक आपल्याला पुस्तकात खिळवून ठेवतो.
गजालीतली माणसं (मालवणी)
गजालीतली माणसं (मराठी)
प्रकाशक – सिंधुदुर्ग प्रतिष्ठान, मुंबई
लेखक – प्रकाश सरवणकर स्वागत मूल्य : 200 रु.