प्लेलिस्ट – जिंदगी की न टुटे लडी…

>> हर्षवर्धन दातार

दिग्गज गायकांच्या सोनेरी काळात काही होतकरू उमेदीच्या कलाकारांनी पार्श्वगायनाच्या क्षितिजावर उगवण्याचा प्रयत्न केला. या तेजस्वी, स्थापित गायकांच्या सौरमंडलाला भेदून पुढे जाणे कठीण काम तर होतेच, पण त्यांच्या जवळपास येणेसुद्धा अशक्य होते. गायकीचा दिग्गज वारसा पुढे नेणाऱया अमितकुमार व नितीन मुकेश या गायकपुत्रांची ही सफर.

हिंदी चित्रपटसृष्टीत जर 1945-1990 हा कालखंड घेतला आणि प्रदीर्घ काळ गाणी गाणाऱया कलाकारांची ाढमवारी लावायची ठरवली तर लता-आशा आणि किशोर-रफी हे पुढच्या पंक्तीत अग्रामात बसतात. महेंद्र कपूर, मुकेश, मन्ना डे, सुमन कल्याणपूर हे त्यांच्या नंतरच्या रांगेत आपले स्थान मिळवतात. अर्थात या सगळ्यांच्या आधी सैगल, तलत मेहमूद, पंकज मलिक, सुरय्या हे नामवंत आहेतच, पण अनेक कारणांकरिता त्यांची कारकीर्द ही त्या मानाने तितकी प्रदीर्घ झालेली नाही.

दिग्गज गायकांच्या सोनेरी काळात काही उमेदीच्या कलाकारांनी (आणि काही ख्यातिप्राप्त गायकांच्या पुढच्या पिढीतील मुलांनी) पार्श्वगायनाच्या क्षितिजावर उगवण्याचा प्रयत्न केला. मात्र या तेजस्वी, स्थापित गायकांच्या सौरमंडलाला भेदून पुढे जाणे कठीण काम तर होतेच, पण त्यांच्या जवळपास येणेसुद्धा अशक्य होते. त्याचे मुख्य कारण या दिग्गजांनी उत्कृष्टतेचा मापदंड इतका उंच नेऊन ठेवला होता की तिथपर्यंत पोहोचणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे होते. तरीही या नवोदितांनी आपापल्या परीने मेहनत केली. आज दोन गायकपुत्रांची चर्चा करूया. आपल्या दिग्गज वडिलांचा वारसा पुढे चालविण्याचा भरकस प्रयत्न या दोघांनी केला.

नट, गायक, विनोदवीर, काहीसा तर्कट, विक्षिप्त पण अफलातून असे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणजे आभास कुमार गांगुली अर्थात अशोक आणि अनुप यांचे बंधू किशोर कुमार. विनोद आणि दुःख याचे अजब रसायन. अमित कुमार हे रुमा गुहा या किशोर यांच्या पहिल्या पत्नीचे अपत्य. अमित कुमारनी जवळपास 750च्या वर गाण्यांना आपला आवाज दिला आहे. 1994 मध्ये आवडते संगीतकार राहुलदेव बर्मन यांच्या निधनानंतर त्यांनी नवीन गाणी करायचे सोडून केवळ स्टेज वाद्यवृंद शोजवर भर दिला.

किशोर कुमारप्रमाणे राहुलदेव बर्मननी अमित कुमार यांना अनेक संधी देऊन पुढे आणण्याचा प्रयत्न केला. बालिका वधू (1976) यातील सचिनवर चित्रित `बडे अच्छे लगते है’ या गाण्याने त्यांना खूप प्रसिद्धी दिली. दूर गगन की छाव में (1964), दूर का राही (1971), बढती का नाम दाढी (1974), शाबाश डॅडी (1979) या आपल्या चित्रपटांतून किशोर कुमारनी त्यांना अभिनयाची संधीसुद्धा दिली. `होश में हम कहाँ’ या दरवाजा (1978) चित्रपटातील गाण्यातून त्यांनी पदार्पण केले. हिंदी तसेच बंगाली, आसामी, ओडिया आणि मराठी भाषांतूनही त्यांनी गाणी म्हटली. देस परदेस (1978) मध्ये `नजर लगे न साथियों’ या धमाकेदार गाण्यात आणि `कस्मे वादे’ (1977) यातील `आती रहेंगी बहारे’ या कौटुंबिक गाण्यात त्यांनी आपल्या वडिलांना युगल गीतात साथ दिली. लव्ह स्टोरी (1981) या कुमार गौरवच्या पदार्पण चित्रपटात `याद आ रही है’ गाण्याकरिता त्यांना लताजींबरोबर फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यांचे आवडते गुरू राहुलदेव बर्मन यांच्या तेरी कसम (1982), आंधी (1976), जवानी (1984) आणि जीवा (1986) मधील गाणी बऱयापैकी लोकप्रिय झाली. राजेश रोशन यांनी त्यांना `बातो बातो में’ (1979), खट्टा मीठा (1978) आणि आखिर क्यों (1985) मध्ये सुरेख चाली दिल्या. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या `तेजाब’ (1988) यातील `कह दो की तुम मेरे हो मेरे’ गाणं तुफान गाजलं. पुढेही आनंद मिलिंद, जतीन-ललित, विजू शहा यांच्याबरोबर त्यांनी अनेक गाणी केली. ख्यातनाम वडिलांइतकं नाही तरी माफक यश अमित कुमार यांनी मिळवलं.

मुकेशचंद्र माथूर अर्थात मुकेश हे आपल्या काळात सरळ, सोप्या प्रामाणिक स्वर आणि निष्ठापूर्वक गायकीकरिता प्रसिद्ध होते. 1976मध्ये त्यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचे सुपुत्र नितीन मुकेश यांनी आपल्या गायन कारकिर्दीला सुरुवात केली. मुकेश यांच्यासारखे नितीन मुकेश यांनीही गाण्याचा प्रयत्न केला. पण अनुनासिक आवाजामुळे त्यांना फार संधी मिळाल्या नाहीत. मुकेश आणि राज कपूर एक हृद्य समीकरण होते. मुकेश यांनी राज कपूर यांना 100हून अधिक गाण्यांत आवाज दिला होता. पुढे राज कपूर यांनी नितीन मुकेशना खूप प्रोत्साहन दिलं आणि `मेरा नाम जोकर’ (1970) – ग्रेसी फील्ड यांच्या `विश मी लक आज यु वेव्ह मी गुडबाय’ या गाण्याचे एक ओझरते संस्करण आणि `सत्यम शिवम सुंदरम’ (1978) वो औरत है तू मेहबूबा चित्रपटात गाण्याची संधी दिली. राज कपूर आपल्या शेवटच्या काळात रुग्णालयात असताना नितीन मुकेश यांनी `बहुत दिया देनेवाले ने तुझको’ हे आपल्या वडिलांचे गाणे त्यांना आपल्या आवाजात ऐकवले.

नितीन मुकेश यांनी लक्ष्मीकांत प्यारेलालबरोबर `ाढांती’ (1981) – जिंदगी की न टुटे लडी, `तेजाब’ (1988) – सो गया ये जहां आणि `रामलखन’ (1989) – माय नेम इज लखन आणि `मेरी जंग’ (1985) – जिंदगी हर कदम एक नयी जंग है… ही माफक गाजलेली गाणी केली. नितीन मुकेश यांचे `जिंदगी’बरोबर विशेष नाते असावे. त्यांनी गायलेल्या अनेक गाण्यांत `जिंदगी’ हा शब्द आहे. संगीतकार खय्यामने नितीन मुकेश यांना `नुरी’ (1979) चित्रपटात गाण्याची संधी दिली. त्यांचे लताजींबरोबरच `आजा रे ओ मेरे दिलबर’ हे गाणे तुफान गाजले. संगीतकार राजेश रोशन यांच्याबरोबर नितीन मुकेशनी बरेच (आणि बरे!) काम केले. `दरिया दिल’ (1988) – वो कहते है हमसे, `खून भरी मांग’ – हसते हसते कट जाये रस्ते, `खुदगर्ज’ (1987) – जिंदगी का नाम दोस्ती आणि `किंग अंकल’ (1993) – इस जहाँ की नही या गाण्यांत त्यांचा आवाज पडद्यावरील नायकाला शोभतो. अमित कुमार आणि नितीन मुकेश यांनी चित्रपट गायकीत माफक यश मिळवले. त्याचबरोबर देशात-परदेशात वाद्यवृंद आणि स्टेज शोजच्या माध्यमातून आपल्या दिग्गज गायक वडिलांच्या आठवणीही श्रोत्यांसमोर प्रस्तुत करत आहेत. अनेकदा आपला समज असतो की आपल्या ख्यातीप्राप्त पालकांप्रमाणे मुलांनीही त्याच क्षेत्रात नाव कमवावे, ख्याती मिळवावी. मात्र हा नियम असत नाही. संगीतकार द्वयी रोशनलाल नागरथ उर्फ रोशन यांचे सुपुत्र राजेश रोशन आणि सचिनदेव बर्मन पुत्र राहुलदेव बर्मन ऊर्फ पंचम हे नियमाला निवडक अपवाद.

(लेखक संगीत अभ्यासक आहेत.)