
>> मेघना साने
इमारतीचे बांधकाम करणारे मजूर, खडी कामगार. त्यांचं दिवसभर मातीत, सिमेंटमध्ये राबणं अन् सोबत मातीच्या ढिगाऱ्यावर त्यांच्या मुलांचं बागडणं सुरू. इथे मुलांचं भविष्य, वर्तमान याची चिंता कुणालाच नाही. दिल्लीत राहणाऱ्या कविता नारायणन-शिंदे या मराठी स्त्राrने मात्र या मुलांना शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळाला पाहिजे हा ध्यास घेतला आणि उभी राहिली गली पाठशाला!
इमारतीचे काम सुरू होते. ट्रकने खडीचे ढिगारे येऊन पडत होते. खडी कामगार डोक्यावर घमेली उचलून इमारतीकडे नेत होते. आयाबाया जमेल तशा मातीचे ढिगारे उचलत होत्या अन् दगडांच्या रांगेत मजुरांची लहान बालके खेळत होती. इमारतीचे काम पाहायला गेलेल्या कविता नारायणन हिने हे सर्व पाहिले. एवढी लहान बालके खडीवर खेळतात? त्यांच्या पायाला खडी टोचत नाही? त्यांच्या डोक्याला ऊन लागत नाही? पलीकडे मातीचा एक ढिगारा ाsढनने उपसला जात होता. इकडे जवळच्या मातीच्या ढिगाऱ्यावर एक मूल मातीत घसरून पडले. कविताने पटकन त्याला उचलून त्याचे तोंड स्वच्छ केले. ही लहान मुले म्हणजे आपल्या देशाची संपत्ती आहे. ती अक्षरश वाया चालली आहे हे तिच्या लक्षात आले.
`आप दिनभर यहीं खेलते हो?’ कविताने थोडय़ा मोठय़ा मुलांना विचारले. कुठून तरी खाली आलेला एक फाटका पतंग घेऊन ती एकमेकांशी भांडत होती.
`हाँ. अब दुपहर की छुट्टी होगी. तब माँ आकर हमें खाना देगी.’ कविताच्या लक्षात आले की, बांधकाम मजुरांची ही मुले अशीच रस्त्यावर, नाल्यांजवळ वाढणार आणि त्यांचे आयुष्य मातीमोल ठरणार. भविष्य काय या मुलांचे? यांना कोणी शाळेतदेखील घालणार नाही. या मुलांना शिक्षण मिळालेच पाहिजे. तो त्यांचा मूलभूत हक्क आहे.
दुसऱया दिवशी तिने झाडाखाली एक लाकडी फळा आणून उभा केला आणि मातीत खेळणाऱया मुलांना गोष्ट सांगण्याच्या निमित्ताने बोलावून घेतले. मग चित्रे काढ, गोष्ट सांग, गप्पा कर असे करत ती त्यांना मुळाक्षरे शिकवू लागली. हळूहळू मुले रमली. रोजच येऊ लागली. फक्त साडेबारा ते दीड एवढाच वेळ ही शाळा चालायची. आजूबाजूचे भाजीवाले, कचरावाले, माथाडी कामगार यांचीही मुले येथे येऊ लागली. मुळाक्षरे आणि आकडेमोड शिकू लागली. त्यांना स्वच्छतेचे धडे देणेही गरजेचे होते. अशी सुरुवात `गली पाठशाला’चा झाली. दिल्लीत राहणाऱया कविता नारायणन-शिंदे या मराठी स्त्राrने ही पाठशाला काढली होती आणि हळूहळू पाच, दहा, पंचवीस… अशी मुलांची संख्या वाढू लागली. नागरिकांनी या उपामाला काही वस्तू दान केल्या. पाटय़ा, पेन्सिली, टेबल, खुर्ची अशा वस्तू मिळाल्या. पण मुख्य प्रश्न होता तो जागेचा. थंडी, ऊन, वारा, पाऊस याला तोंड देऊन शाळा सुरू ठेवायची तर तिच्यासाठी व्यवस्थित निवारा पाहिजे. राजेंद्रनगरमधील शंकर रोडवरील `सनातन धर्म मंदिरा’च्या कमिटीने त्यांच्या आवारात शाळेसाठी एक खोली दिली आणि कविता नारायणन हिने आपल्या उच्चशिक्षित मैत्रिणींच्या मदतीने हे शिक्षणकार्य पुढे नेले. या मैत्रिणी होत्या, डॉ. ललिता भल्ला (सर गंगाराम हॉस्पिटल), डॉ. खुशबू गर्ग (डेंटिस्ट), डॉ. दीप्ती (डेंटिस्ट). मग कविताने रीतसर धर्मादाय संस्था स्थापन केली.
आज ही शाळा `गली पाठशाला’ म्हणून नावाजली गेली आहे. विज्ञान, भाषा, हस्तकला हे विषय शिकवणारे शिक्षक तिथे आहेत आणि पहिलीपासून दहावीपर्यंतचे शिक्षण तिथे मिळू शकते. 2011 मध्ये स्थापन झालेल्या या शाळेतून काही उत्तम विद्यार्थी घडले आहेत. त्यांच्यातील चांगले गुण बाहेर आले आहेत.
`आमचा आदित्य उत्तम ािढकेटपटू आहे. तर अमन कॅफे उघडून स्वतचा व्यवसाय करत आहे. या मुलांना आता बांधकाम मजूर म्हणून काम करावे लागणार नाही.’ कविता सांगत होत्या. `अजून बरेच काम करायचे बाकी आहे आणि आम्ही ते करणार आहोत. डॉ. किरण बेदी यांना मी आदर्श मानते. त्या माझ्या मार्गदर्शक आहेत.’
`गली पाठशाला’तर्फे अनेक उपाम होतात. मुले सामाजिक संदेश देणारे नाटक बसवतात. हे `नुक्कड नाटक’ बघायला अनेक पालक, नागरिक पार्कमधे येतात. त्याचे विविध विषय असतात. मुली बारा-तेरा वर्षांच्या झाल्या की पालक त्यांची लग्ने ठरवू लागतात. अशा बालविवाहाच्या विरोधात नाटकातून संदेश दिला जातो. मुलांना शिक्षणाकडे वळवा, त्यांना आपल्या पायावर उभे राहू द्या हा संदेशदेखील ही लहान मुले नाटकांतून देत असतात. `झाडे लावा’ हा संदेश तर ती मुले प्रत्यक्ष कृतीतून देतात. पार्कमधे `ट्री प्लॅन्टेशन’ असा मुलांचा उपाम असतो. मुले स्वतच झाडे लावतात व ती वाढताना पाहतात.
ही मुले जेव्हा शाळेत येतात तेव्हा त्यांचे पालक कामावर गेलेले असतात. हल्ली मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक भेडसावू लागला आहे. म्हणून या शाळेत चारी बाजूंनी कॅमेरे लावलेले आहेत. कविता नारायणन शिंदे सांगत होत्या की, कोरोनाच्या काळातही त्यांनी या मुलांना नीट सांभाळले. एका गच्चीत मास्क लावून मुले शिकत होती. घरी बसण्यासारखी तरी घरे कुठे असतात त्यांची? त्यापेक्षा ती शाळेतच सुरक्षित होती. सर्व मुलांची महिन्यातून एकदा वैद्यकीय तपासणी होत असते. कोरोनाच्या काळात काही मुलांना नागरिकांनी दान केलेले लॅपटॉप मिळाले. प्रज्ञा पैठणकर या महिलेने भरपूर देणगी दिल्याने कोरोनाच्या काळात मुलांच्या आईबाबांना शाळेकडून रेशन पाठवता आले. कामगारांच्या हाताला काम नव्हते. त्यांची रोजीरोटी बंद होती. जगण्याचा प्रश्न होता. शिक्षण वगैरे नंतरच्या गोष्टी.
`गली पाठशाला’मध्ये मुलांना जगण्याचे शिक्षण देण्यासाठी हस्तकला, चित्रकला याबरोबर प्राथमिक स्वयंपाककलादेखील शिकवली जाते. शाळेत इंडक्शन कॉईल आहे. आता वाचनालय पण आहे. तिथे मुले गोष्टीची पुस्तके, विज्ञानाची पुस्तके वाचू शकतात. `गली पाठशाला’मधील मुले स्वतच्या पायावर उभी राहून आता अनेक गल्ल्यांमध्ये व्यवसाय करताना दिसत आहेत.