
>> आशुतोष बापट
छत्तीसगड जांजगीर आणि चंपा ही दोन्ही ठिकाणं सुंदर व देखणी आहेत. त्यातील जांजगीर येथील शिल्पसमृद्ध मंदिरं पाहायलाच हवीत.
जांजगीर-चंपा हा भाग छत्तीसगडच्या मध्यवर्ती भागात वसलेला असल्यामुळे त्याला छत्तीसगडचे हृदय असे म्हटले जाते. जांजगीर आणि चंपा ही दोन वेगवेगळी ठिकाणे पण एकमेकांना लागून असलेली. जांजगीर-चंपा प्रदेशाचे मुख्यालय जांजगीर इथेच आहे. छत्तीसगड म्हटले की भोरमदेवाचे मंदिर डोळ्यासमोर येते. मात्र जांजगीर इथे असलेले विष्णू मंदिरसुद्धा तितकेच सुंदर, देखणे आणि भोरमदेवपेक्षा जास्त शिल्पसमृद्ध आहे. जांजगीर हे विलासपूरपासून 65 कि.मी. आणि रायपूरपासून 175 कि.मी. अंतरावर वसलेले आहे. इथे असलेले विष्णू मंदिर जवळ जवळ 12 फूट उंच जोत्यावर बांधलेले. तिथे चढून जायला पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराचा सभामंडप आता शिल्लक नाही. फक्त गर्भगृह दिसते. त्यावर असलेल्या अनेक मूर्ती आणि त्या गाभाऱ्याचे प्रवेशद्वार इतके अप्रतिम आहे की वर्णन अपुरे पडेल. द्वारशाखेवरील शिल्पकला फारच देखणी आणि विविधतेने नटलेली आहे.
गाभाऱ्यात 4 पायऱ्या चढून जावे लागते. त्यातल्या दोन पायऱ्या हत्ती आणि व्याल शिल्पांनी मढवल्या आहेत. उंबरठासुद्धा खूप सुरेख सजवला आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखा फारच सुंदर दिसतात. गंगा आणि यमुनेच्या मूर्ती दोन बाजूंना आणि त्यांच्या बाजूला द्वारपाल. ललाटबिंबावर विष्णूची प्रतिमा असून त्याच्या खाली असलेल्या तीन कोनाड्यात ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्या प्रतिमा. मंडोवरावर म्हणजे गाभाऱ्याच्या बाह्यभिंतींवर अगदी खच्चून शिल्पकला केलेली आहे. विष्णूच्या विविध मूर्ती, नरसिंह, वराह वगैरे अवतार आणि महत्त्वाचे म्हणजे विष्णूच्या 24 विभवांच्या मूर्ती इथे ठरावीक जागी एकेक अशा कोरलेल्या दिसतात.
निरनिराळ्या व्यालप्रतिमा, साधक, वादक, नागपुरुष अशा एक ना अनेक प्रतिमा इथे या मंदिरावर आहेत. तसेच अष्टदिक्पाल त्यांच्या वाहनांसमवेत त्यांच्या त्यांच्या दिशांना कोरलेले आहेत. मंदिराची पार्श्वदेवता सूर्य आहे. फार सुंदर अशी ही सूर्याची मूर्ती. हातात दोन कमळे, पायाशी सेविका अशी देखणी मूर्ती इथे दिसते. तसेच विविध सुरसुंदरींनी हे मंदिर मढलेले आहे. देखणे स्थापत्य आणि सुंदर मूर्तीकला यांनी बहरलेले आहे. सर्वांगसुंदर असे हे मंदिर बघून डोळे दिपून जातात. एकाच जोत्यावर उभे असलेले हे स्थापत्य आपल्याला खिळवून ठेवते. या जोत्यावरून मंदिराला प्रदक्षिणा घालता येते. त्यावेळी विविध शिल्पे बघून इथून पाय निघत नाही. कितीही वेळा प्रदक्षिणा घातली तरी ती शिल्पे बघून समाधान होत नाही इतकी सुंदर इथली शिल्पकला आहे.
मंदिराचा निव्वळ गाभारा आज शिल्लक आहे. याचा सभामंडप, मुखमंडप जेव्हा इथे अस्तित्वात असतील तेव्हा त्याच्यावर केलेली सुबक शिल्पकला किती सुंदर असेल याची नुसती कल्पनाच करावी लागते. पण गाभाऱ्यावर असलेल्या शिल्पांवरून आपण त्या शिल्पकलेचा किमान अंदाज बांधू शकतो. अतिशय देखणे आणि डौलदार असे हे मंदिर छत्तीसगडच्या अनेक सुंदर मंदिरांपैकी एक आहे. अशा एकाहून एक देखण्या मंदिरांमुळे हा प्रदेश रमणीय झालेला आहे. धार्मिकतेबरोबर कलाकारांची बहरलेली सौंदर्यदृष्टी ही या प्रदेशाची खासियत होती.
या विष्णू मंदिराशेजारीच रस्त्याच्या पलीकडे एक शिवमंदिर आहे. हे शिवमंदिर सध्या पूजेत नाही. त्याच्या गाभाऱ्यात काही मूर्तींचे अवशेष ठेवलेले दिसतात. पण या छोटेखानी मंदिराचा परिसर छान ठेवला आहे. याला अगदी लागून देवीचे एक मंदिर आहे. त्या मंदिरात भक्तांचा खूप राबता असतो. त्यामुळे तिथे बसायला बाके वगैरे ठेवलेली आहेत. पण तिथल्याच या शिव मंदिराकडे कुणाचे फारसे लक्ष जात नाही. या शिव मंदिराच्या द्वारशाखा फार आकर्षक असून याच्या ललाटबिंबावर शिवप्रतिमा कोरलेली आहे. उत्तरांगावर म्हणजे या ललाटबिंबाच्या वरच्या बाजूला नृत्यशिवाचे फार देखणे शिल्प दिसते. या मंदिरालासुद्धा सभामंडप वगैरे काहीच नाही. नुसता गाभारा शिल्लक आहे. आणि मंदिराचे शिखर चांगल्या स्थितीत आहे. गाभाऱ्याच्या बाह्यभिंतीवर अंधकासुरवध, नृत्य गणेश तसेच योगीशिवाचे शिल्प कोरलेले दिसते.
या मंदिराचे आगळेवेगळे वैशिष्ट्य याच्या गाभाऱ्याच्या पाठीकडील भिंतीवर आहे. इथे मंदिराच्या पाठीमागच्या भिंतीवर जिथे पार्श्वदेवतेचे शिल्प असते तिथे एकावर एक दोन देवकोष्ठे असून त्यात असलेल्या मूर्ती केवळ अफलातून आणि अवश्य बघण्यासारख्या आहेत. त्या दोनपैकी खालच्या देवकोष्ठात उभ्या स्थितीतील सूर्याची मूर्ती आहे. तिच्या हातात कमळे असून पायाशी 7 घोडे दिसतात. तर त्याच्यावर असलेल्या देवकोष्ठात `शिव-सूर्या’ची अत्यंत दुर्मीळ अशी मूर्ती आहे. ही मूर्ती बसलेली असून तिला चार हात आहेत. मागच्या दोन हातात त्रिशूळ आणि नाग अशी शिवाची आयुधे तर नैसर्गिक दोन हातात कमळे दिसतात. डोक्यावर मुकुट असून अंगावर दागिने कोरलेले आहेत. अशी मूर्ती फारशी कुठेच दिसत नाही. अत्यंत दुर्मीळ प्रकारातली ही मूर्ती आहे. डॉ. किरीट मनकोडी यांनी अशा प्रकारच्या मूर्तीवर सविस्तर लिखाण केलेले आहे. जांजगिर इथले विष्णू मंदिर बघितल्यावर शेजारचे हे मंदिर अवश्य बघायलाच हवे. द्वारशाखेपासून ते अगदी सगळ्या मंदिरावर शिवप्रतिमा कोरलेल्या दिसतात यावरून हे शिव मंदिर आहे हे स्पष्टच आहे. मात्र पुरातत्त्व विभागाने लावलेल्या फलकावर हे विष्णू मंदिर असल्याचे लिहिले आहे. ते असे का लिहिले ते त्यांनाच माहीत.
(लेखक लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत)