
>> सुरेश चव्हाण
आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुलेंपासून सुरू झालेला ‘स्त्री शिक्षणाचा वारसा’ पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा बी, पद्मभूषण ताराबाई मोडक, पद्मश्री अनुताई वाघ, सिंधुताई अंबिके, चित्रा नाईक, लीलाताई पाटील, सुनंदाताई पटवर्धन, रेणू दांडेकर, मंगेशी मून या ‘सावित्रीच्या लेकी’ पायाभूत शिक्षणासह बाल शिक्षण, प्रयोगशील, रोजगार निर्मितीक्षम अशी विविधांगी शिक्षण पद्धती समाजाच्या विविध स्तरांमध्ये सक्षमपणे रुजवत आहेत. काल झालेल्या ‘जागतिक महिला दिना’निमित्ताने त्यांच्या या सुधारणावादी कार्यास सलाम…!
19 व्या शतकात 1850 च्या आसपासच्या काळात `स्त्राr शिक्षण’ हा विषय समाजात खळबळ निर्माण करीत होता. एकंदर समाजाचा कल स्त्रियांच्या शिक्षणाच्या विरोधात होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत जोतिबा फुले यांच्या प्रेरणेने सावित्रीबाईंनी शिक्षण घेतले. त्या केवळ स्वतपुरतेच शिक्षण घेऊन थांबल्या नाहीत, तर शिक्षणाने त्यांची संवेदनशीलता विकसित झाली. केवळ पतीनिष्ठेपोटी नाही तर सावित्रीबाईंनी अत्यंत विचारपूर्वकपणे जोतिराव फुलेंना त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात वेगवेगळ्या प्रकारे मदत केली. तत्कालीन प्रतिकूल काळात मुस्लिम समाजातील एका स्त्रीने सावित्रीबाई फुलेंच्या बरोबर मुलींच्या शाळेत शिकवण्याचे काम मोठ्या उत्साहाने आणि जिद्दीने केले त्यांचे नाव होते, ‘फातिमा बी.’ 1948 मध्ये केवळ पाच मुलींना बरोबर घेऊन पुण्यातील भिडे वाड्यात महात्मा फुलेंच्या मार्गदर्शनाने सावित्रीबाईंनी मुलींची शाळा सुरू केली होती.
मुलांच्या मानसिक वाढीच्या दृष्टीने पूर्व प्राथमिक शिक्षण गरजेचे आहे या विषयाची गरज प्रथम इटलीतील शिक्षणतज्ञ `मादाम मॉन्टेसरी’बाईंनी मांडली. पूर्व प्राथमिकचे शिक्षण `मॉन्टेसरी’ या नावानेच ओळखले जाऊ लागले. या शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि कार्यासाठी ताराबाई मोडकांनी जन्मभर कार्य केले. बोर्डी, कोसबाड यांसारख्या आदिवासी भागातील मागास समाजापर्यंत पूर्व प्राथमिक म्हणजेच बाल शिक्षणाचा प्रवाह पोहोचवून भारतात बाल शिक्षणाची मुहूर्तमेढ रचली. 1945 मध्ये हुजूरपागा शाळेतील नोकरी सोडून अनुताई वाघ या ताराबाई मोडक यांच्या बालशिक्षण कार्यात प्रथम शिक्षिका म्हणून प्रथम सहभागी झाल्या, परंतु या कार्यात सेवाभावी वृत्तीने त्या एकरूप झाल्या. ताराबाईंच्या संकल्पना, योजना, प्रकल्प प्रत्यक्षात उतरवण्याचे काम अनुताई करीत असत. दोघींमध्ये गुरू-शिष्याचे नाते होते. ताराबाई आणि अनुताईंसोबत सिंधुताई अंबिके या शिक्षिका कार्यकर्तींचा 51 वर्षांचा कार्यकाल बघितला की, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे तीन गुणविशेष ठळकपणे जाणवतात. एक म्हणजे ताराबाईं आणि अनुताईंवरील अढळ निष्ठा. दुसरे म्हणजे या दोन शिक्षणतज्ञांच्या शिक्षणविषयक विचारांशी संपूर्ण बांधिलकी आणि तिसरा गुणविशेष म्हणजे त्यांनी सुचवलेले उपाम समर्पण भावनेने तडीस नेण्याचा दृढनिश्चय. बालगीते, गोष्टी, गाणी अशा माध्यमांतून मुलांना शिक्षणाची गोडी लावणाऱ्यासिंधुताई `विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षिका’ ठरल्या आहेत.
ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. चित्रा नाईक यांनी शिक्षणविषयक विपुल लेखन केले आहे. त्यातील प्रौढ शिक्षणासाठीची पुस्तके महत्त्वाची आहेत. मुलांसाठी त्यांनी लिहिलेली चार पुस्तके ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ने 14 भाषांमध्ये प्रसिद्ध केली आहेत. `शिक्षण आणि समाज पत्रिके’च्या त्या संपादक होत्या. पन्नासहून जास्त वर्षे शिक्षण क्षेत्रात विविध प्रकारचे विधायक कार्य करणाऱ्याडॉ. चित्रा नाईक यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरांवरचे 21 पुरस्कार मिळाले आहेत.
मुलांच्या मानसिकतेवर आधारित बाल शिक्षण पद्धतीत मोलाची भर घालत 1985 साली लीलाताई पाटील यांनी कोल्हापूरमध्ये ‘सृजन आनंद विद्यालय’ ही प्राथमिक शाळा सुरू केली. विद्यालयाची कार्यपद्धती ठरवताना जी भूमिका घेतली गेली, त्यात ‘मूल ही एक स्वतंत्र व्यक्ती असते. त्याच्या स्वातंत्र्यास बाधा न आणता, त्याच्या सृजनास वाव देत-देत आनंदाने शिकण्यास मदत करणे,’ या मुलाला शिक्षित करण्याच्या प्रक्रियेला गाभा मानण्यात आला. शिक्षण कृतीतून उमलावे. बघणे, निरखणे, पारखणे, समजून घेणे, प्रश्न विचारणे, चर्चा करणे, आपला तर्क पडताळून पाहणे, स्वत:ला समजलेले दुसऱ्याला समजावून सांगणे, आपल्याला जे वाटते ते योग्य पद्धतीने व्यक्त करणे हे सर्व शिक्षणाचे पैलू आहेत.
जव्हार, मोखाडासारख्या दुर्गम भागातील आदिवासींच्या पुढील पिढय़ांचे भविष्य 1972 पासून सुनंदाताई आणि त्यांचे यजमान वसंतराव पटवर्धन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या `प्रगती प्रतिष्ठान’च्या माध्यमातून घडत आहे. आदिवासींच्या मूक-बधिर मुलांची व त्यांच्या पालकांची हतबलता जाणून 1985 पासून अशा मुलांचे जगणे सुलभ करण्यासह त्यांना विशेष प्रशिक्षण देणारी निवासी शाळा सुरू केली. शिक्षण आणि आरोग्य या व्यतिरिक्त प्रतिष्ठानने या दुर्गम भागाच्या पायाभूत विकासातही मोठी कामगिरी केली आहे. वारली आदिवासींच्या आयुष्यात सुनंदाताईंनी घडवलेल्या परिवर्तनामुळे आज ते सन्मानाने जगत असून त्यांची आर्थिक स्थितीही सुधारली आहे.
रत्नागिरीतील दापोलीमधील चिखलगावात गरीब शेतकरी मुलांसाठी डॉ. राजा दांडेकर व रेणू दांडेकर यांनी शाळा सुरू केली. आठवी ते दहावीच्या मुलांसाठी या शाळेत कौशल्य विकास उपाम सुरू आहेत. या उपामाची मूळ संकल्पना डॉ. कलबाग यांची होती. या उपामांद्वारे माध्यमिक शालांत बोर्डाच्या अभ्यापामाबरोबरच मूलभूत तंत्रज्ञानावर आधारित चार प्रकारच्या अभ्यासाची ओळख करून दिली जाते. अभियांत्रिकी, ऊर्जा पर्यावरण, शेती आणि गृह व आरोग्य हे ते चार अभ्यापाम होत. यातून `कमवा आणि शिका’ या उपामाची सुरुवात शाळेपासूनच होते.
रस्त्यावर आपल्याला कित्येक लहान मुले फुगे, गजरे, खेळणी विकताना तसेच भीक मागतानाही दिसतात. अशा मुलांसाठी मंगेशी मून यांनी 2015 पासून मुंबईतूनच ‘उमेद संकल्प’ संस्थेंतर्गत कामाला सुरुवात केली. वर्ध्यातील ‘रोठा’ या त्यांच्या वडिलांच्या गावी अकरा एकरांमध्ये बांधलेल्या वसतिगृहात अशी सत्तर मुले आज पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून पुण्यातील कोथरूड येथे एका इमारतीतील भाड्याच्या जागेत `उमेद’चा नवीन प्रकल्प मंगेशी मून यांनी सुरू केला आहे. त्यांची कन्या ऋत्विजा हिने स्वतच्या कॉलेजच्या शिक्षणासह वयाच्या 19 व्या वर्षी 35 मुलांची जबाबदारी घेतली आहे. या कार्याबद्दल मंगेशी यांना टक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अशा या ‘सावित्रीच्या लेकीं’चे शिक्षण क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे.