
आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘नॅशनल जिओग्राफिक’, ‘हायपर अॅलर्जिक’, ‘मायामी हेराल्ड’, ‘फोब्ज’ मासिकाने कौतुक केलेल्या ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तेजस ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली फाउंडेशनच्या संशोधकांनी नेपाळमध्ये केलेल्या पालींच्या संशोधनाची न्यूझीलंड येथील ‘झुटाक्सा’ जर्नलने दखल घेतली आहे.
ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनने नेपाळमध्ये प्रदेशानिष्ठ पालींच्या तीन दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला. सर्टोडॅक्टलस चितवानएन्सीस, सर्टोडॅक्टलस अन्नपूर्णाएन्सीस, सर्टोडॅक्टलस करणशाही अशी पालींच्या प्रजातींची नावे आहेत. जनुकीय संचामध्ये वैविध्यपूर्ण असलेल्या या पालींवर आधारित संशोधन ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या संशोधकांनी केले. या संशोधनाची न्यूझीलंड येथील ‘झुटाक्सा’ जर्नलने दखल घेतली आणि नावीन्यपूर्ण संशोधन असल्याची दाद देत संशोधनाला प्रसिद्धी दिली आहे. संशोधन लेखकांच्या टीममध्ये हिंदुस्थानातून तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर, ईशान अगरवाल यांचा समावेश होता. त्याचबरोबर नेपाळचे तीन, जर्मनीचा फ्रँक तिल्लक तसेच ऑस्ट्रेलियाच्या तीन संशोधकांनी पालींवर आधारित विस्तृत संशोधन लेखनात योगदान दिले आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या पुढाकाराने विविध देशांतील संशोधक एकत्र येऊन पालींच्या संशोधनात विशेष कामगिरी करीत आहेत. त्यामुळे फाउंडेशनच्या संशोधन कार्याची वेळोवेळी देश-विदेशात दखल घेतली जात आहे.
तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर, ईशान अगरवाल, संतोष भट्टराय, बिवेक गौतम, बिशाल प्रसाद नेउपाने, फ्रँक तिल्लक, अॅशले आर. ओल्सन, फिओना होगन, वेंडी राईट यांनी केलेल्या संशोधनाला ‘झुटाक्सा’ जर्नलने दाद दिली आहे. त्यामुळे ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन व संशोधकांच्या संपूर्ण टीमचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे.
पालींच्या नामकरणाची खासियत
सर्टोडॅक्टलस चितवानएन्सीस, सर्टोडॅक्टलस अन्नपूर्णाएन्सीस, सर्टोडॅक्टलस करणशाही या पालींच्या प्रजाती फक्त नेपाळमध्ये आढळतात. प्रदेशानिष्ठ पाली म्हणून त्यांचे त्या-त्या भागातील महत्त्व विचारात घेत नामकरण केले आहे. ‘सर्टोडॅक्टलस चितवानएन्सीस’ प्रजाती चितवान भागात आढळते. त्या परिसरावरून तिचे नामकरण केले आहे. ‘सर्टोडॅक्टलस अन्नपूर्णाएन्सीस’ ही प्रजाती ‘अन्नपूर्णा’ या संरक्षित क्षेत्रात आढळते, तर ‘सर्टोडॅक्टलस करणशाही’ प्रजातीचे नाव शास्त्रज्ञ करण शाह यांच्या नावावरून त्यांच्या कामाचा गौरव म्हणून ठेवले आहे.