फडणवीसांनी शिंदे यांच्या बिल्डर ‘मित्रा’ला हटवले, अजय आशर यांचे उपाध्यक्ष पद काढले; प्रवीण परदेशी संस्थेचे नवे सीईओ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखी एक धक्का दिला आहे. शिंदे यांचे बिल्डरमित्र अजय आशर यांना फडणवीस यांनी ‘मित्रा’ संस्थेच्या उपाध्यक्षपदावरून हटवले आहे. या निर्णयामुळे शिंदेंना राजकीय धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. आशर यांच्या जागी दिलीप वळसे पाटील, राणा जगजितसिंह पाटील, राजेश क्षीरसागर यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर फडणवीस यांचे विश्वासू प्रवीण परदेशी यांच्याकडे या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनची (मित्रा) निर्मिती केली गेली. शिंदे मुख्यमंत्री असताना मित्रा संस्थेच्या उपाध्यक्षपदी बांधकाम व्यावसायिक अजय आशर आणि डॉ. राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली होती. दोन वर्षापूर्वी झालेल्या दावोस दौऱ्याच्या शिष्टमंडळात आशर यांचाही समावेश होता. या संस्थेवरून आता फडणवीस यांनी आशर यांना हटवून शिंदेंना धक्का दिला.

आशर देश सोडून पळाला – संजय राऊत

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. पण माझ्या माहितीप्रमाणे आशर देश सोडून पळून गेला आहे. तो ठाण्यातला बिल्डर होता. त्याचे उद्योग सर्वांना माहीत आहेत. एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण व्यवहार पाहणारा, जमिनीचे व्यवहार करणारा आणि त्यांच्या पैशांचा संरक्षक म्हणून त्याची ओळख आहे. शिवसेनेमध्ये फूट पडली त्यावेळी आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी अजय आशर याने पैशांची देवाणघेवाण केली होती. हजारो कोटींची संपत्ती त्याने बेकायदेशीरपणे गोळा केली आहे.