Satish Bhosale news – बीडच्या खोक्याभाईला सुरेश धस यांचा 100 टक्के आशीर्वाद, ऑडिओ क्लिप व्हायरल

वाल्मीक कराड तुरुंगात गेल्यानंतर आता बीडमध्ये खोक्याभाई उगवला आहे. ‘आका’च्या विरोधात रान पेटवणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता असलेला खोक्याभाई उर्फ सतीश भोसले याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओमध्ये तो आणि त्याचे पंटर एकाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. तर आणखी एका व्हिडीओमध्ये तो कारमध्ये पैशांची गड्डी उधळताना दिसतोय. या खोक्याभाईचे नवनवीन कारनामे उघड असतानाच आता सुरेश धस यांनीही तो आपलाच कार्यकर्ता असल्याचे मान्य केले होते. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे.

दरम्यान, खोक्याभाईसोबत सुरेश धस यांचे अनेक फोटोही समोर येत असतानाच एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे. या खोक्याभाईला सुरेश धस यांचा 100 टक्के आशीर्वाद आहे. विशेष म्हणजे सुरेश धस यांनी स्वत: सतीश भोसले याला फोन केल्याचे आणि ते त्याला खोक्या बोलत असल्याचे यातून समोर आले आहे.

सतीश भोसले याच्या वाढदिवसानिमित्त सुरेश धस यांनी त्याला फोन लावला होता. ‘ए खोक्या, हॅलो अरे सॉरी हा बाबा, मला गडबडीमध्ये जमलं नाही शुभेच्छा द्यायला’, अशी सुरुवात सुरेश धस करतात. यावर सतीश भोसले म्हणतो की, ‘बोला ना..’ त्यानंतर सुरेश धस पुढे म्हणतात की, ‘काय नाही काय नाही, वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा.’ यावर सतीश भोसले म्हणतो, ‘धन्यवाद भाऊ…तुमचा आशीर्वाद राहुद्या फक्त पाठिशी…’, यावर सुरेश धस म्हणतात, ‘100 टक्के आहे 100 टक्के…99 सुद्धा नाही.’

सुरेश धस आणि खोक्याभाई यांच्यातील संभाषणाची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. खोक्याभाईच्या दहशतीचे अनेक व्हिडीओ याआधी समोर आले असून त्यात ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्याने सुरेश धस अडचणीत आले आहेत.

कोण आहे सतीश भोसले?

सतीश भोसले हा बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. गेल्या चार-पाच वर्षापासून तो राजकारणामध्ये सक्रिय असून भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद त्याच्याकडे आहे. आमदार सुरेश यांचा तो कट्टर समर्थक असून त्याच्यावर याआधीही अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती मिळतेय.