छत्रपतींचा अपमान करणारे चिल्लर कोरटकर, सोलापूरकर कुणाच्या आशीर्वादाने बाहेर फिरताहेत? संजय राऊत यांचा खणखणीत सवाल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर सडकून टीका केली आहे. अबू आझमीला निलंबित केले जाते, मुस्लिम असल्याने ते सोपे पडते. पण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा घोर अपमान करणारा प्रशांत कोरटकर सरकारला सापडत नाही. कोरटकरला का आणि कुणी अभय दिले आहे. चिल्लर कोरटकर आणि राहुल सोलापूकर कुणाच्या आशीर्वादाने बाहेर फिरताहेत? असा खणखणीत सवाल राऊत यांनी शुक्रवारी सकाळी माध्यमांनी बोलताना केला.

प्रशांत कोरटकर याचे फोटो आणि त्याचा वावर देशाच्या गृहमंत्र्यांपासून ते महाराष्ट्राच्या राज्यपालांपर्यंत आणि आएएएस, आयपीएस अधिकाऱ्यांपर्यंत आहे. राहुल सोलापूरकर हा आरएसएसच्या मुख्यालया जाऊन बैठका घेतो. सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराजांना भ्रष्टाचारी म्हणतो. आग्र्याहून सुटका हा छत्रपतींच्या जीवनातील दिग्विजय आहे. पण आरएसएस, सोलापूरकर सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटताना कुठलेही शौर्य दाखवले नाही. औरंगजेबाच्या लोकांना, कुटुंबाला लाच दिली आणि ते सुटले. छत्रपती शिवाजी महाराज भ्रष्ट आहेत हा सोलापूरकरच्या बोलण्याचा अर्थ आहे. त्याच्यावर फडणवीस आणि त्यांच्या सरकारने काय कारवाई केली? हे एक प्रकारे औरंगजेबाचे उदात्तीकरणच असून सोलापूरकरला अटक करून त्याच्यावर राजद्रोहाचा खटला चालवायला पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.

संजय राऊत यांनी भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची, मुंबईवरचा मराठी ठसा पुसून टाकायचा, मराठी माणसाची विभागणी करायची हे काही लपून राहिलेले नाही. मुंबईत मराठी माणसाला जागा नाकारण्याचे प्रकार भाजपचेच लोक करतात. मंगलप्रभात लोढा, गुंडेचा बिल्डर हे भाजपचेच देणगीदार आहेत. भैयाजी जोशी आणि फडणवीस यांनाही हे माहिती आहे. अशावेळी मुंबईचा भाषा गुजराती असे छातीठोकपणे सांगणे हे त्यांच्या पुढच्या रणनीतीचाच भाग आहे. त्यांनी एक ठिणगी टाकून पाहिली. भाजपचे हे षडयंत्र आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

अजय अशर आणि त्याचे राजकीय ‘आका’ ईडीची फिट केस, फडणवीसांच्या निर्णयाचे स्वागत करत संजय राऊत यांचा शिंदेंवर घणाघात

मुंबईची भाषा मराठी नाही हे इथे येऊन बोलता. मग चेन्नईला जाऊन हिंदुस्थानची राष्ट्रभाषा हिंदी आहे हे बोलून दाखवा. दक्षिणेतील राज्यांमध्ये हिंदीविषयी बोलण्याची आणि हिंदीचा प्रचार करण्याची संघवाल्यांची ताकद आहे का? कोलकातामध्ये सर्वभाषीय लोक राहतात, तिथे जाऊन असं बोलू शकता का? पण इकडे राज्यकर्ते दुबळे आणि डरपोक आहेत, त्यांचे पाणी या लोकांनी जोखलेले आहे, म्हणून अशी विधानं केली जातात. खरे तर भैयाजी जोशी यांनी माफी मागायला पाहिजे होती आणि विधानसभेत काल त्या प्रकारचा ठरावही मंजूर करून घ्यायला हवा होता, असेही राऊत म्हणाले.