
महायुतीत सर्व सुरळीत आहे, असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रोज नवीन धक्के दिले जात आहेत. शिंदे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) सहव्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांची उचलबांगडीची बातमी ताजी असतानाच आता त्यांनी ‘मित्र’ या संस्थेच्या उपाध्यक्षपदावरून शिंदेंनी नेमलेल्या अजय अशर याची हकालपट्टी केली आणि प्रवीण परदेशी यांची नेमणूक केली. या निर्णयाचे स्वागत करत संजय राऊत यांनी अजय अशर आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार घणाघात केला.
अजय बिशर हा ठाण्यातला बिल्डर होता आणि त्याचे उद्योग सगळ्यांना माहिती आहेत. एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण व्यवहार पाहणारा, त्यांच्या जमिनीचे व्यवहार करणार आणि त्यांच्या पैशाचा संरक्षक म्हणून अजय अशरची ओळख आहे. तीन वर्षांपूर्वी शिवसेना फोडण्याचा आणि आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. पैशांची ही देवाणघेवाण करण्यामध्ये अजय अशर, सूरतचे भाजप खासदार आणि इतर काही ठेकेदार होते, या सगळ्यांनी मिळून आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला, असे राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, अजय अशर याने हजारो कोटींची संपत्ती बेकायदेशीरपणे गोळी केली. त्याने देशही सोडलेला आहे. निरव मोदी, विजय मल्ल्यासह अनेक लोक देश सोडून पळाले आणि आता अजय अशरही पळाला. तहव्वूर राणाला परत आणण्यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. पण मोदी, मल्ल्या, अशर हे आर्थिक क्षेत्रातील दहशतवादी आहेत, त्यांना कधी परत आणणार?
माजी मुख्यमंत्र्यांसाठी त्याने कुठे आणि कसा पैसा गोळा केला यासाठी त्याची अटक करून त्याची झडती घेतली पाहिजे. किमान 10 हजारकोटी घेऊन अजय अशर हा परदेशात स्थायिक व्हायला गेला आहे. त्याच्याकडे सध्याच्या सरकारमधील अनेकांनी पैसे गुंतवले आहे. फडणवीस यांनी ‘मित्र’ संघटनेवरून अजय अशरला दूर करून चांगला अधिकारी नेमला तर त्याचे स्वागत केले पाहिजे, असेरी राऊत म्हणाले.
अशा लोकांवर ईडीची कारवाई होत नाही का? असे विचारले असता राऊत म्हणाले की, अजय अशर आणि त्याचे ‘आका’ ही ईडीची फिट केस आहे. ईडी यांच्यापर्यंत पोहोचणार आहे का? गृहमंत्रालयाने अजय अशरविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची चौकशी केली पाहिजे. एकदा आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली, पण पैशाच्या बाबतीत सगळ्यांची ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ ही भूमिका असते.
फडणवीस यांनी सुरु केलेल्या स्वच्छता मोहिमेतून शिंदेंचे पंख छाटण्याचा प्रयत्न सुरू आहे का असे विचारले असता राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना पंख कधीच नव्हते. ते फक्त बेडुक उड्या मारायचे. पंख असलेला माणूस गरूड झेप घेतो, अशा प्रकारचे घाणेरडे कृत्य करत नाही. त्याच्यामुळे त्यांना पंख होते आणि पंख छाटले हे मान्य नाही. त्यांच्या उड्यांना बंदी घातली आहे, असे राऊत म्हणाले.