
राज्यात वाढत असलेल्याया महिला अत्याचाराच्या घटना, बेपत्ता तरुणी व महिलांचे वाढते प्रमाण यावर आज महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.
बलात्काराच्या प्रकरणात वाढ होत असताना पुणे स्वारगेट प्रकरणी पोलिस प्रशासन आणि मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे पीडित महिलेची बदनामी झाली. यामुळे मंत्री योगेश कदम यांचा राजीनामा झाला पाहिजे. मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर देखील महिलेने गंभीर आरोप केले असल्याने या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली.
महिला झाल्या बेपत्ता, सरकारला नाही पत्ता, महिला सुरक्षेचा नुसतं गाजर, सरकारला नाही पाझर, बेटी बचाव जुमला है, ये मंत्री दरिंदा है, अशा जोरदार घोषणा देत मंत्री जयकुमार गोरे व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
निवडणुकीत लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार अशी घोषणा महायुतीने केली होती. पण सरकार आल्यावर मात्र लाडक्या बहिणींना अपात्र केले जात आहे, 2100 रुपये कधी देणार? ही भूमिका सरकार स्पष्ट करत नसल्याने महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकार विरोधात विरोधकांनी जोरदार निदर्शने केली.