भिवंडीच्या बापगावचे शेतकरी आक्रमक; पणन महामंडळाच्या जागेची मोजणी रोखली

bapgaon-bhiwandi-farmers-aggressive-counting-of-the-land-stopped

भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या जागेची मोजणी करण्यास शेतकऱ्यांनी आज कडाडून विरोध केला आणि मोजणी रोखली. त्यामुळे भूमिअभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांना या जागेची मोजणी न करताच माघारी फिरावे लागले. बापगावमधील ही जागा शासनाने एक्सपोर्ट प्रकल्प राबविण्यासाठी पणन महामंडळाला दिली आहे.

बापगाव येथील सर्व्हे क्रमांक ११८ अ या जमिनीवर शासनाचा एक्सपोर्ट प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ही जागा शासनाने पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या नावावर केली आहे. मात्र या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाली असल्याने कृषी पणन महामंडळाकडून जमीन मोजणी करण्याची मागणी केली होती. त्यासाठी आज भूमिअभिलेख कार्यालयाचे अधिकारी स्थानिक पडघा पोलीस ठाण्यातील पोलीस पथकासह मोजणीस्थळी दाखल झाले. यावेळी स्थानिक गावकऱ्यांनी या मोजणीला प्रखर विरोध केल्याने अखेर प्रशासनाला मोजणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करावी लागली.

शंकांचे समाधान करणार

येत्या काही दिवसात बैठका घेऊन ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांच्या शंकांचे समाधान केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने मोजणी करणे गरजेचे असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र सरपंच भारती गोडे, उपसरपंच बाळाराम गोडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या प्रखर विरोधामुळे सद्यस्थितीत ही मोजणी थांबविण्यात आली आहे.