
खोपोलीतील प्रभाग क्रमांक 1 मधील 20 एकर जागेवर आरक्षित केलेल्या डम्पिंग ग्राऊंडच्या कचऱ्यामुळे लवजीवासीयांची कोंडी होणार आहे. या डम्पिंगच्या निषेधार्थ शेकडो नागरिकांनी नगरपालिकेवर धडक दिली. या मोर्चादरम्यान महिला आणि वृद्धांनी ठिय्या मांडून आक्रोश व्यक्त केला. दरम्यान संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन या डम्पिंगला विरोध असल्याचा एकमुखी ठराव करत आमच्या आरोग्याशी खेळाल तर खबरदार, असा इशाराच ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.
कर्जत-खोपोली मार्गावर लवजी गाव असून या भागाचा झपाट्याने विकास होत आहे. डम्पिंगसाठी आरक्षित केलेली जागा ग्रीन झोन आहे. या जागेवर अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. या परिसरात शाळा, मंदिर, पर्यटनस्थळे आहेत. मात्र नगररचना विभागाने ही जागा डम्पिंगसाठी आरक्षित केल्याने ग्रामस्थांची झोपच उडाली आहे. भविष्यात होणाऱ्या या डम्पिंगमुळे ग्रामस्थांची डोकेदुखी वाढणार असल्याने स्थानिक रहिवासांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. यासाठी ग्रामस्थांनी नगरपालिका मुख्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन केले.
तीव्र आंदोलनाचा इशारा
मिल गावच्या हद्दीत असलेला डम्पिंग ग्राऊंड काही धनदांडग्यांच्या हेतूने लवजी परिसरात आणण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याविरोधात ग्रामस्थांनी डम्पिंग हटाव मोहीम हाती घेतली आहे. आज आंदोलनानंतर ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी पंकज पाटील यांची भेट घेतली. यावेळी भूखंडावरील आरक्षण रद्द करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाला दिला आहे.