रायगडचे जिल्हाधिकारी कोणत्या ‘आका’च्या दबावाखाली; जेएसडब्ल्यू हायटेन्शन लाईनविरोधात वडखळ ते नागोठणे शेतकरी एकवटणार

जेएसडब्ल्यू कंपनीच्या हायटेन्शन लाईनविरोधात नागोठणे ते वडखळ असा आंदोलनाचा एल्गार करण्यात आला आहे. यासाठी नागोठणे हद्दीतील पळस ग्रामपंचायतीत चार गावातील शेतकरी उद्या एकवटून आंदोलनाची रूपरेषा ठरवणार आहेत. दरम्यान, हायटेन्शन लाईनला विरोध करणाऱ्या पाच महिलांना मातीत गाडण्याची धमकी देऊनही या भयंकर प्रकाराबाबत साधी प्रतिक्रिया द्यायला रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांना वेळ मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून कलेक्टर साहेबांवर कोणत्या ‘आका’चा दबाव तर नाही ना, असा सवाल विचारला आहे.

जेएसडब्ल्यू कंपनीच्या हायटेन्शन लाईनला शेतकऱ्यांनी ठाम विरोध केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी, प्रांत तसेच रोहे तहसील कार्यालयावर अनेकदा धडक देत न्यायासाठी टाहो फोडला आहे. मात्र अधिकारी आणि स्थानिक पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक मूग गिळून गप्प असल्याचा आरोप या विभागातील शेतकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी हायटेन्शन लाईनचे काम बंद करण्याची मागणी करणाऱ्या नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाहेरशीव गावातील रेवती म्हात्रे, भारती म्हात्रे, धर्मी म्हात्रे, वर्षा म्हात्रे व बेबी म्हात्रे यांना मातीत गाडण्याची धमकी कंत्राटदार कंपनी बीएनसीचा अधिकारी चौधरी व राम घरत यांनी दिल्याची तक्रार शेतकऱ्यांनी दिली आहे. मात्र यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप होत आहे.

यापुढे दादागिरी खपवून घेतली जाणार नाही

आंदोलनाचा इशारा देणाऱ्या पळस, बाहेरशीव, वागळी, शेतपळस येथील शेतकरी शुक्रवारी बैठक घेणार आहेत. यावेळी आंदोलनाची रूपरेषा ठरवतानाच महिलांना जीवे मारण्याची धमकी देणारा कंत्राटदार चौधरी व राम घरत यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे. यापुढे दादागिरी करून कोणी आमच्या शेतीत घुसण्याचा प्रयत्न केल्यास खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही शेतकरी मिलिंद डाकी, नारायण जोशी, रघुनाथ म्हात्रे, चंद्रकांत दुर्गावाले, ज्ञानेश्वर शिर्के, किरण डाकी, गणपत कदम, सचिन जोशी, सुरेश नाईक, तुकाराम बोरकर यांनी दिला आहे.

मस्साजोगसारखी घटना घडल्यावर कलेक्टर साहेब जागे होणार का?

महिलांना धमकावणाऱ्या कंत्राटदारावर आणि त्याच्या साथीदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. मात्र याकडे पोलीस यंत्रणा कानाडोळा करत आहेत. दैनिक ‘सामना’ने पाठपुरावा करून हा गंभीर प्रकार चव्हाट्यावर आणला आहे. याबाबत सर्व बातम्या आणि विषयाची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांना देण्यात आली. मात्र दोन दिवस उलटले तरी जावळे हे दूरध्वनी अथवा व्हॉट्सअॅपवर साधी प्रतिक्रिया देत नसल्याने मस्साजोगसारखी घटना घडल्यावर कलेक्टर साहेब जागे होणार का? असा सवाल विचारला आहे.