
कल्याण, डोंबिवलीतील बेकायदा बांधकामे हटवण्याची मोहीम जोरात असतानाच आता पालिकेने कल्याण रिंग रोडचे कामही हाती घेतले आहे. कल्याण रिंग रोडमध्ये बाधित होणारी 32 बांधकामे पालिका प्रशासनाने आज जमीनदोस्त केली. याशिवाय आंबिवली रेल्वे स्थानक ते मोहने रस्ता या मार्गावरील फेरीवालेही हटवण्यात आले. यामुळे मोहने येथील रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे.
कोर्टाच्या आदेशानुसार पालिकेने बोगस रेरा नोंदणी घेतलेल्या 65 बांधकामांवर कारवाईची तयारी सुरू केली आहे. यासोबतच प्रत्येक प्रभाग क्षेत्रातील बेकायदा बांधकामे नियमितपणे तोडली जात आहेत. तसेच कल्याण रिंग रोडचे उर्वरित कामही सुरू केले आहे. पालिकेचे ‘अ’ प्रभागक्षेत्र सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी अटाळी येथील बाह्यवळण रस्ता बाधित शिल्लक सदनिकांपैकी 32 सदनिका भुईसपाट करण्याची धडक कारवाई केली.