19 वर्षे मुंबईबाहेर रखडलेल्या खारमधील रहिवाशांना घरे कधी मिळणार? वरुण सरदेसाई यांचा सवाल

खार पूर्व गोळीबार रोड येथे शिवालिक बिल्डरचा प्रकल्प रखडल्याने गेली 19 वर्षे बारा हजार लोक विस्थापित झाले आहेत. त्यांना लवकरात लवकर घरे मिळावीत यासाठी सरकारने बिल्डरवर कारवाई करून तो प्रकल्प ताब्यात घ्यावा, अशी जोरदार मागणी शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी केली.

वरुण सरदेसाई यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून या मुद्दय़ाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. 2006 मध्ये या पुनर्विकास प्रकल्पासाठी शिवालिक बिल्डरला 92 एकर जमीन देण्यात आली होती, मात्र 19 वर्षे उलटली तरी तो प्रकल्प पूर्ण झालेला नाही. आतापर्यंत फक्त 30 टक्के लोकांना घरे मिळाली आहेत. प्रकल्पातील इतर हजारो लोक घरे न मिळाल्याने मुंबईबाहेर फेकले गेले आहेत. ट्रान्झिट कॅम्पमध्ये जे आहेत ते तेथील दुरवस्थेमुळे पंटाळले आहेत. दोन पिढय़ा गेल्या तरी प्रकल्प पूर्ण झालेला नाही आणि रहिवाशांना घरभाडेही मिळणे बंद झाले आहे असे सरदेसाई म्हणाले.

– शिवालिक बिल्डरला प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण करता येईल की नाही याची खातरजमा करण्यात येईल. रखडलेले प्रकल्प पूर्ण करून त्या मुंबईबाहेर वर्षानुवर्षे राहत असलेल्या लोकांना पुन्हा मूळ ठिकाणी आणण्यास प्राधान्य दिले जाईल, पात्र झोपडीधारकांच्या वारसांना प्रमाणपत्र, घरभाडे आणि खरेदी-विक्रीबाबतच्या मुद्दय़ांवरही लवकरच बैठक घेऊन तोडगा काढला जाईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.