हिंदुस्थानात ‘टेस्ला’ला मोठं आव्हान, आघाडीच्या टाटा आणि महिंद्रा कंपन्यांशी स्पर्धा होणार

अमेरिकन उद्योगपती एलन मस्क यांची ईव्ही कार कंपनी ‘टेस्ला’ आता हिंदुस्थानच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. टेस्लाचे हिंदुस्थानातील पहिले शोरूम मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे सुरू होणार आहे. अशात आता जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी टेस्लाच्या हिंदुस्थान प्रवेशाबाबत केलेल्या वक्तव्याने लक्ष वेधून घेतलेय. सज्जन जिंदाल यांनी म्हटलंय, टेस्लासाठी हिंदुस्थानातील इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत प्रवेश करणे सोपे नसेल. कारण टेस्लाला टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रासारख्या देशांतर्गत कंपन्यांच्या स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे.

र्अन्स्ट अँड यंग ‘एंटरप्रेन्योर ऑफ द इयर’ पुरस्कारांमध्ये बोलताना जिंदाल म्हणाले, टेस्ला आणि त्यांचे सीईओ एलन मस्क यांना हिंदुस्थानी बाजारपेठ आव्हानात्मक वाटू शकते. एलन मस्क येथे नाहीत. ते अमेरिकेत आहेत. आपण हिंदुस्थानी इथे आहोत. जे महिंद्रा करू शकते व टाटा करू शकते, ते मस्क निर्माण करू शकत नाहीत. हिंदुस्थानातील ऑटोमोबाईल उद्योगाविषयी सज्जन जिंदाल म्हणाले, ‘‘आपल्या स्थानिक कंपन्या टेस्लासारख्या ग्लोबल प्लेयर्सच्या पुढे आहेत. मस्क खूप हुशार आहेत यात काही शंका नाही. ते एक असामान्य व्यक्ती आहेत. अंतराळासह इतर क्षेत्रांतही त्यांचे काम आहे. त्यांनी अद्भुत काम केले आहे, पण हिंदुस्थानात यशस्वी होणे सोपे काम नाही.