बीडचा आका गेला जेलात आता खोक्याभाई उगवला! भाजप आमदार सुरेश धस यांच्या मारकुट्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

गेले तीन महिने महाराष्ट्र आका, आकाच्या आकाची दहशत अनुभवतोय. यापैकी एक आका जेलात गेला आणि त्याचा आका राजीनामा देऊन एकांतवासात गेल्याने बीडकर थोडा उसासा टाकत नाहीत तोच नवीन खोकेभाई उगवला! ‘आका’च्या विरोधात रान पेटवणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले आणि त्याचे पंटर एकाला बॅटने बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि ही अमानुषता पाहून राज्य पुन्हा हादरून गेले. दरम्यान, या प्रकरणी तक्रार देण्यासाठी कोणीही समोर न आल्याने पोलिसांनीच स्वतःच फिर्याद देत या खोकेभाईवर गुन्हा दाखल केला आहे.

बीडमधील कराड गँगच्या दहशतीचे रोज नवनवे पुरावे देणारे भाजप आमदार सुरेश धस यांच्याच कार्यकर्त्याने घातलेला उच्छाद पाहून राज्यात खळबळ उडाली आहे. भाजपचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले आणि त्याचे पंटर एका जणास बेदम मारहाण करतानाचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी स्वतःहून फिर्याद देत सतीश भोसलेसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. आठ दिवसांपूर्वीही शिरूर तालुक्यातील बाबी येथे सतीश भोसले याने एका कुटुंबाला बेदम मारहाण केली होती. मारहाण झालेल्या व्यक्तीचे दात पाडण्यात आले होते. या प्रकरणात तक्रार देण्यात आली होती, पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आज या कुटुंबाने पुन्हा पोलिसांकडे धाव घेत दाद मागितली. त्यानंतरभोसलेवर दुसरा गुन्हा दाखल झाला.

खोक्याभाईची दहशत

भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या निकट वर्तुळातील म्हणून सतीश भोसलेची ओळख आहे. ‘खोकेभाई’, ‘गोल्डमॅन’ अशीही त्याची दुसरी ओळख आहे. हा खोकेभाई आलिशान गाड्यांचा मालक आहे. गाडय़ांवरून नोटांची उधळण करतानाचे त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हेलिकॉप्टरमधून उतरतानाचाही त्याचा एक व्हिडीओ आहे. या भोसलेकडे एवढा पैसा आला कोठून, असा सवाल आता विचारला जात आहे.

तो माझाच कार्यकर्ता आहे, पण पाठीशी घालणार नाही – धस

सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ हा जुना आहे. त्याच्याविरोधात तक्रार देण्यासाठी कोणी समोर आले तर पोलिसांनी कोणताही मुलाहिजा न बाळगता सतीश भोसलेवर कारवाई करावी, असे भाजप आमदार सुरेश धस म्हणाले.

काय जळत आहे हे धसांना दिसले नाही का?

गेल्या तीन महिन्यांपासून कराड गँगचे कारनामे उघड करणारे भाजप आमदार सुरेश धस यांना आपले कार्यकर्ते काय करत आहेत हे दिसले नाही का? की जाणीवपूर्वक त्यांनी सतीश भोसलेच्या गुंडगिरीकडे दुर्लक्ष केले, असा सवाल केला जात आहे.