
राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नग्न फोटो पाठवल्याचा आरोप करणाऱ्या महिलेने पुन्हा जयकुमार गोरेंविरोधात आवाज उठवला आहे. जयकुमार गोरेने मला दंडवत घातला. म्हणून चांगुलपणाच्या भावनेतून मी केस मागे घेतली, असा दावा पीडित महिलेने केला आहे.
काय म्हणाली महिला?
2019 मध्ये शपथविधीमध्ये गोरेला जेव्हा ही केस अडथळा ठरत होती. त्यावेळी त्यांनी माझ्यावर प्रेशर आणलं. आम्ही तुम्हाला जीवे मारू, तुमच्या कुटुंबाला त्रास देऊ. यामुळे ऑक्टोबर 2019 ला मी केस मागे घेतली. केस करतानाही डगमगले नाही. मी लेखी जबाब मागितला की, पुन्हा असं करणार नाही आणि कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही. हे सर्व केल्यानंतर त्याने मला माफीनामा लिहून दिला. कोर्टच्या चेंबरमध्ये मी भावासोबत होते तिथे गोरेचा वकील पण होता. तिथे गोरेने मला दंडवत घातला, मी चुकलो, मला माफ करा. मला वाटलं याला इतकी शिक्षा झाली म्हणजे हा काही करणार नाही. म्हणून चांगुलपणाच्या भावनेतून मी केस मागे घेतली आणि म्हणून तो निर्दोष सुटला. अन्यथा ही केस त्याला निर्दोष सुटू देणार नव्हती, असे महिलेने म्हटले.
काल तो जे बोलला पेपर दाखवतोय. निर्दोष सुटलो, पण नाही. तू निर्दोष होतास तर तुला 10 दिवस पोलिसांनी आत का ठेवला? मुंबई उच्च न्यायालयाने तुझा जामीन अर्ज का फेटाळला. साताऱ्याच्या कोर्टात अटकपूर्व जामीन का फेटाळला गेला? मग पोलीस स्टेशनला हजर राहिल्यानंतर जामीन मिळाला. त्यावेळी तू निर्दोष नव्हता का? तुझा न्यायव्यवस्थेवर विश्वात नव्हता का? मी तुझ्यावर उपकार केले तुला सोडून तर तू मलाच पुन्हा त्रास द्यायला लागला आहेस. त्या त्रासाला कंटाळून मी आता पुन्हा संघर्ष करायचा ठरवलं आहे, असा इशारा महिलेने दिला आहे.