
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर दुसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध निर्णयांचा धडाका लावला. यामध्ये अवैध स्थलांतरितांना लष्करी विमानांनी परत पाठवण्याचा निर्णय चर्चेत राहिला आहे. यावर जगभरातून टीका झाली आहे. आता ट्रम्प प्रशासनाने अवैध स्थलांतरितांना परत पाठवण्यासाठी लष्करी विमानांचा वापर थांबवल्याचं वृत्त आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा हा विषय चर्चेत राहणार आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलने यासंदर्भात एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे. संरक्षण अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं हे वृत्त देण्यात आलं आहे. या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लष्करी विमानांनी अवैध स्थलांतरितांना मायदेशी पाठवणं खर्चिक होत असून हा खर्च न परवडणारा आहे. पुढील खर्च उचलण्यासाठी अमेरिकेच्या संरक्षण विभागानं असमर्थता दर्शवली आहे. यामुळे शेवटची उड्डाणे ही 1 मार्च रोजी झाली होती आणि त्यानंतर पुढील उड्डाणांचं अद्याप कोणतंही नियोजन नसल्याच्या वृत्ताला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
सत्तेत परतल्यानंतर लष्करी विमांनांचा वापर करून बेकायदेशीर स्थलांतरितांना मायदेशी पाठवण्याच्या प्रशासनाच्या कारवाईला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर इमिग्रेशन धोरणांचा भाग म्हणून बघितलं जात होतं. अवैध स्थलांतरित आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील हा एक मजबूत संदेश असल्याचं बोललं जात होतं.
दरम्यान, संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी यापूर्वी सांगितलं होतं की, ‘एक स्पष्ट संदेश आहे… जर तुम्ही कायदा मोडलात, जर तुम्ही गुन्हेगार असाल, तर तुम्ही तुमचा मार्ग शोधू शकता… मात्र तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेत राहता येणार नाही’.
धोरण लागू झाल्यापासून, प्रशासनाने हिंदुस्थान, ग्वांतानामो बे, इक्वेडोर, पेरू, होंडुरास आणि पनामा यासारख्या देशांमध्ये अवैध स्थलांतरितांना पाठवण्यासाठी सी-17 आणि सी-130 लष्करी विमानांचा वापर केला आहे. मात्र ही उड्डाणे लष्करासाठी चांगलीच महागडी ठरली, हिंदुस्थानात लोकं पाठवण्यासाठी प्रत्येकी $3 दशलक्ष खर्च आला आणि अन्य काही उड्डाणांसाठी प्रत्येकी $20,000 खर्च आला.
या तुलनेत, नागरी विमानांवर उड्डाणांना प्रति तास $8,500 ते $17,000 दरम्यान खर्च येतो. तर यूएस ट्रान्सपोर्टेशन कमांडनुसार, C-17 लष्करी विमानाला प्रति तास $28,500 खर्च येतो. याव्यतिरिक्त, मेक्सिकोच्या हवाई हद्दीत प्रवेश करणाऱ्या अमेरिकन लष्करी विमानांवर निर्बंधांमुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च आणखी वाढला आहे. यामुळे अमेरिकेच्या लष्कराला आणखी मोठा फटका बसत आहे.
काही लॅटिन अमेरिकन देशांनी अमेरिकन लष्करी विमानांद्वारे हद्दपार केलेल्या स्थलांतरितांना स्वीकारण्यास थेट नकार दिला आहे. जानेवारीमध्ये, कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी दोन C-17 उड्डाणांना प्रवेश नाकारला, ज्यामुळे ट्रम्प यांनी शुल्क आकारण्याची धमकी दिली. यानंतर पुन्हा व्हाईट हाऊसकडून माहिती देण्यात आली की, कोलंबियाने निर्वासितांना स्वीकारण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र तिथे कोणतेही अमेरिकन लष्करी विमान उतरलेले नाही. त्याऐवजी, कोलंबिया आणि व्हेनेझुएलाने निर्वासित नागरिकांची वाहतूक करण्यासाठी स्वतःच्या व्यावसायिक उड्डाणांचा वापर केला आहे.
यासोबतच अधिकाऱ्यांनी सूचित केलं की लष्करी विमानांचे उड्डाणांचे निलंबन किती वाढवणार किंवा कायमचे बंद केले जाऊ शकते का, यावर अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही.