
मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे. सुरेश भैयाजी जोशी यांनी हे जाणून घ्यावं आणि आपल्या विधानाबाबत माफी मागावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. ते विधानभवन येथे माध्यमांशी संवाद साधत होते.
मुंबईत विविध राज्य आणि प्रांतातील लोक राहतात. विविध भाषा बोलतात. मुंबईत अनेक भाषा आहेत. घाटकोपरची भाषा गुजराती आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे असे नाही, अशी मुक्ताफळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी उधळली होती. या विधानाचा आदित्य ठाकरे यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला.
भैयाजी जोशी म्हणतात घाटकोपरची भाषा गुजराती आहे. आता तुम्हाला कळले असेल की बुलेट ट्रेन ही नेमकी का आणि कुणासाठी करत आहेत. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशप्रमाणे आज आपल्याला ठामपणे सांगण्याची वेळ आली आहे की मुंबई, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, असे आदित्य ठाकरे ठणकावून म्हणाले.
मुंबईमध्ये देशभरातून लाखो लोक स्वप्न घेऊन येतात. काम घेऊन येतात आणि मोठे होतात. यावर आमचा आक्षेप नाही. पण या मुंबई आणि मराराष्ट्राची भाषा मराठी आहे हे सुरेश जोशी यांनी जाणून घ्यावे. त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागायला पाहिजे. अन्यथा जशी अबू आझमी, कोरकटर, सोलापूरकरवर कारवाईची मागणी करत आहोत, तशी कारवाई भैयाजी जोशींवर झाली पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खरोखरच या मातीतील असतील तर त्यांनी यावर उत्तर द्यावे, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिले.
किती सोसायचं हा विचार करण्याची वेळ आलीय
सुरेश उर्फ भैयाजी जोशी यांनी जे वक्तव्य केले आहे, ते प्रत्येक मराठी माणसाने ऐकावे. कारण गेल्या काही वर्षात भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचा, महापुरुषांचा अपमान, मराठी भाषेचा अपमान करत आला आहे. मुख्यमंत्री निवडणुकीच्या आधी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला असे सांगत होते. खरी परिस्थिती ही आहे की महाविकास आघाडी सरकार मरीन ड्राईव्ह येथे मराठी भाषा भवन उभारणार होते. त्याला महायुती सरकारने स्थगिती दिली. गिरगाव चौपाटी येथे मराठी नाट्यकलेचे दालन करणार होतो, त्याला स्थगितीच नाही तर ते रद्द करून टाकले. आज आपल्या महापुरुषांचा अपमान सुरू असून हे किती सोसायचं हा विचार करण्याची वेळ आली आहे, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
View this post on Instagram