बब्बर खालसाच्या दहशतवाद्याला अटक; रशियन बनावटीचं पिस्तूल, दारुगोळा जप्त, ISI शी संबंध असल्याचा आरोप

बब्बर खालसा आंतरराष्ट्रीयचा (बीकेआय) दहशतवादी लजार मसीह याला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश एसटीएफ आणि पंजाब पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत कौशांबी जिल्ह्यातून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. गुरुवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. लजार मसीह याच्यावर पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंध असल्याचा आरोप असून तो गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पंजाबमधून गायब झाला होता.

लजार मसीह हा पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातील रामदास भागातील कुर्लियान गावचा रहिवाी आहे. त्याला यूपी एसटीएफ आणि पंजाब पोलिसांनी गुरुवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास कौशांबी जिल्ह्यातील कोखराज भागातून अटक केली.

पोलिसांनी त्याच्याकडून रशियन बनावटीचे (Norinco M-54 Tokarev) पिस्तूल, तीन जिवंत ग्रेनेड, 2 डिटोनेटर, 13 जिवंत काडतुसं, पांढऱ्या रंगाची स्फोटक पावडर जप्त केली आहे. यासह गाझियाबादचा पत्ता असणारे एक आधार कार्ड आणि बिना सिमकार्डवाला एक मोबाईल फोनही त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे.

लजार मसीह हा बब्बर खालसाच्या जर्मन मॉड्यूलचा दहशतवादी स्वर्ण सिंह उर्फ जीवन फौजीसाठी काम करत होता. तसेच पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या एजंटच्या संपर्कातही होता.