महिलांना गाडण्याची धमकी देणाऱ्या रायगडातील ‘वाल्मिक कराड’ ची चौकशी, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले चौकशीचे आदेश

जेएसडब्ल्यू कंपनीच्या हायटेंशन लाईनविरोधात आवाज उठवणाऱ्या शेतकरी महिलांना मातीत गाडण्याची धमकी देणाऱ्या माफियांची चौकशी होणार आहे. दैनिक ‘सामना’ने ठेकेदार आणि त्याच्या बगलबच्चांची दादागिरी चव्हाट्यावर आणताच याची गंभीर दखल घेत रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गुंडांना हाताशी धरून शेतकऱ्यांवर दडपशाही करणाऱ्या कंत्राटदार बीएनसी कंपनीला दणका बसला आहे.

जेएसडब्ल्यू कंपनीच्या हायटेंशन लाईनसाठी नागोठणे विभागातील पळस ग्रामपंचायत हद्दीत टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र शेतकयांची फसवणूक करत कंत्राटदार बीएनसी कंपनी मनमानी पद्धतीने काम करून शेतीचे नुकसान करत आहेत. याच तुघलकी कारभाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या रोहे तालुक्यातील बाहेरशीव गावातील रेवती म्हात्रे, भारती म्हात्रे, धर्मी म्हात्रे, वर्षा म्हात्रे व बेबी म्हात्रे यांना मातीत गाडण्याची धमकी कंत्राटदार चौधरी व राम घरत यांनी दिल्याची तक्रार शेतकऱ्यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात दिली आहे. या भयंकर प्रकाराबाबत 5 मार्च रोजी दैनिक ‘सामना’ने ‘रायगडात वाल्मिक कराड शेतकरी महिलांना गाडण्याची धमकी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. याची गंभीर दखल घेत रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी चौकशीचे आदेश दिले असून दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

.. तर नराधमांनी आमचा बळी घेतला असता

शेतीची कामे करण्यासाठी बाहेरशीव गावातील रेवती म्हात्रे, भारती म्हात्रे, धर्मी म्हात्रे, वर्षा म्हात्रे व बेबी म्हात्रे या गेल्या होत्या. मात्र कंत्राटदाराने केलेले नुकसान पाहून या महिलांनी तत्काळ काम थांबवा अशी मागणी केली. त्यावर कंत्राटदार चौधरी व राम घरत यांनी या महिलांना दमदाटी करत पळता की तुमच्यावर जेसीबीने माती टाकून खड्यात गाडू अशी धमकी दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आम्ही आमच्याच हक्काच्या जमिनीवरून घरी निसटलो अन्यथा त्या नराधमांनी आमचा बळी घेतला असता, अशी धक्कादायक माहिती या महिलांनी कुटुंबीयांना दिली आहे.