पुणे पोलीस दलात लवकरच ‘सर्व्हेलन्स व्हेईकल, गंभीर गुन्ह्यांचा तपास वेगाने

महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून अधिक खबरदारी घेण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने आता पुणे पोलिसांना अत्याधुनिक यंत्रसामुग्री असलेली 5 वाहने (सव्हॅलन्स व्हेईकल) उपलब्ध होणार आहेत.

बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर संबंधित घटनांसह इतर तपासाला मोठी मदत होणार आहे. बसमध्ये थर्मल इमेजिंग कॅमेरे, जीपीएस यंत्रणा, इन्फ्रारेड सेन्सरसह विविध अत्याधुनिक यंत्रणा असणार आहे. गंभीर गुन्ह्यांच्या तपासात वाहनांची मदत होणार आहे. संवेदनशील भागात गस्त, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या बंदोबस्तात वाहनांचा समावेश केला जाणार आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पाठपुराव्यामुळे ही अत्याधुनिक वाहने लवकरच पुणे पोलीस दलात समाविष्ट केली जाणार आहेत.

संबंधित वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, थर्मल इमेज सुविधा असलेले कॅमेरे तसेच जीपीएस यंत्रणा आहे. चित्रीकरणाची सुविधा असून, तातडीने तपासासाठी उपयुक्त माहिती कॅमेऱ्यांद्वारे उपलब्ध होणार आहे. संवेदनशील भागात अशाप्रकारची वाहने तैनात केली जाणार आहेत. बसमध्ये असलेले कॅमेरे ३६० अंशात फिरणारे असून, त्यामाध्यमातून बारकाईने लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. संशयित वाहनांवरील क्रमांक टिपला गेल्यास त्वरित संबंधित वाहनांच्या मालकाची माहिती उपलब्ध होणार आहे.

एका वाहनाची किंमत दीड कोटी; अत्याधुनिक यंत्रणेने वाहने सज्ज

■ मध्यवर्ती स्वारगेट एसटी स्थानकात तरुणीवर अत्याचार केल्यानंतर पसार आरोपी उसाच्या फडात लपला होता. त्याच्या शोधासाठी 500 पेक्षा जास्त पोलीस तैनात होते. दरम्यान, पुणे पोलीस दलात दाखल होणाऱ्या सव्र्व्हेलन्स व्हेईकलमधील कॅमेरे अंधारातही काम करण्याच्या ताकदीचे आहेत. दाट झाडीत लपलेल्या संशयितांना कॅमेरे टिपतील. शासनाने अशाप्रकारची पाच वाहने उपलब्ध करून दिली आहेत. या महिन्यात सव्र्व्हेलन्स व्हेईकल पुणे पोलीस दलात दाखल होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित चार वाहने पोलीस दलात दाखल होतील. एका वाहनाची किंमत साधारणपणे दीड कोटी आहे.