तुमची गाडी ओळखा, सोडवा… घेऊन जा! पिंपरी आरटीओचे आवाहन; जप्त वाहन 30 दिवसांत न नेल्यास लिलाव

‘वायुवेग’ पथकाने विविध वाहतूक नियमभंगांच्या गुन्ह्यांअंतर्गत जप्त केलेली वाहने प्रक्रिया पूर्ण करून सोडून नेण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड आरटीओ प्रशासनाने केले आहे. आरटीओकडे अशी 189 वाहने असून, 30 दिवसांत प्रक्रिया पूर्ण न केल्यास या वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येईल, अशी माहिती पिंपरी आरटीओ प्रशासनाकडून देण्यात आली. जप्त केलेली ही वाहने विविध ठिकाणी ठेवण्यात आली असून, अनेक वाहनांना गंज लागला आहे.

वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय ‘फ्लाइंग स्क्वाड’च्या माध्यमातून कारवाई करते. कारवाईनंतर तत्काळ दंड वसूल केला जातो. तर, काही गंभीर प्रकरणात संबंधित वाहनांवर खटला दाखल करून ती जप्त केली जातात. अटकावून ठेवण्यात आलेल्या वाहनांवरील कार्यवाही पूर्ण करून वाहनधारकांनी संबंधित वाहन सोडवून घेणे अपेक्षित असते. मात्र, जप्त केलेली अनेक वाहने वर्षानुवर्षे सोडविली जात नाहीत. त्यावरील कर, दंड भरला जात नसल्याने ती वाहने आरटीओतच पडून असतात. परिणामी, काही ठराविक कालावधीनंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून या वाहनांचा लिलाव केला जातो. सध्या पिंपरी आरटीओकडे अशी 189 वाहने आहेत. यामध्ये चारचाकीसह इतर वाहनांचा समावेश आहे. ही सर्व वाहने सध्या प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवड, तळेगाव एसटी बस डेपो, तळेगाव पोलीस ठाणे, राजगुरूनगर एसटी डेपो, वल्लभनगर डेपो यांच्या आवारात ठेवण्यात आली आहेत. मात्र, बऱ्याच कालावधीपासून एकाच जागी वाहने असल्याने अनेक वाहनांना गंज चढलेला आहे. त्यामुळे त्याचे मूल्यांकनदेखील कमी होत असून, अनेकदा आवाहन करून ती सोडवून नेली जात नाहीत.

त्यामुळे आता पुढील 30 दिवसांत ही वाहने कायदेशीर कारवाई पुर्ण करून सोडून न्यावीत, असे आरटीओकडून सांगण्यात आले आहे. या वाहनांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तीस दिवसांच्या कालावधीत देखील ही वाहने सोडून न नेल्यास बेवारस समजून त्यांचा शासनाच्या नियमानुसार लिलाव केला जाईल, असे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.