घरातील कर्ता माणूस गेला, पण आरोपी सापडेना; 56 दिवसानंतरही पसार कारचालकाचा खडकी पोलिसांना थांगपत्ता लागेना

‘घरातील एकमेव कर्ता माणूस अपघातात गेला, त्यामुळे कुटुंबीयांचा आधार गेला. मात्र, घटनेला 56 दिवस उलटल्यानंतरही पसार झालेल्या कारचालकाचा खडकी पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही. 7 जानेवारी रोजी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाकडेवाडी भागात ही घटना घडली होती.

रामदास दामोदर कडू (वय – 56, रा. पीएमसी कॉलनी, वाकडेवाडी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांच्या पत्नी उज्ज्वला (वय – 48) यांनी खडकी पोलिसांत फिर्याद दिली. 7 जानेवारी रोजी मध्यरात्री 12च्या सुमारास वाकडेवाडी येथील बजाज गार्डनच्या पुढील कॉर्नरला ही घटना घडली.

फिर्यादी यांचे पती रामदास कडू हे प्रिटिंग मशीन रिपेअरिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. घरात ते एकटेच कमवते होते. 22 वर्षीय मुलगी आणि पत्नीसह ते वाकडेवाडी येथे राहायला होते. ६ जानेवारी रोजी सकाळी ते आकुर्डी येथे कामाला गेले. रात्री उशिरापर्यंत ते परत न आल्याने पत्नीने त्यांना कॉल केला, तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने त्यांचा फोन उलचला आणि रामदास कडू यांचा वाकडेवाडी भागात अपघात झाल्याचे सांगितले. त्या क्षणी पत्नी आणि मुलीने घटनास्थळी धाव घेतली.

कडू यांना उपचारांसाठी जवळील सह्याद्री रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने 11 जानेवारी रोजी उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घरची परिस्थिती हलाखीची, त्यातच उपचारांना मोठा खर्च झाल्याने कुटुंबीयांनी उसने पैसे घेऊन त्यांच्यावर उपचार केले. दरम्यान, घटना घडल्यानंतरही खडकी पोलिसांना अद्यापि आरोपीचा शोध लागलेला नाही. याबाबत तपास सुरू असल्याचे खडकी पोलिसांकडून सांगण्यात आले.

कुटुंबीयांकडून पोलीस आयुक्तांची भेट

अपघाताची घटना घडल्यानंतर लगेचच 15 जानेवारी रोजी कुटुंबीयांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली होती. ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणी अपघाती मृत्यू होऊन अद्यापि आरोपी पकडला जात नसल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा कुटुंबीयांनी सोमवारी (3 रोजी) पोलीस आयुक्तांची भेट घेतली. मात्र, अद्यापि आरोपी पकडण्यात पोलिसांना यश येऊ शकले नाही.