
समग्र शिक्षा विभागातील कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम करून घेण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. आमची मागणी पूर्ण करा अन्यथा स्वेच्छा मरणाची परवानगी द्या, असा इशाराच या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
कार्यक्रम अधिकारी विषयक साधन व्यक्ती, संगणक प्रोग्रामर, डाटा एन्ट्री ऑपरेटर, वरिष्ठ लेखा सहाय्यक, दस्तऐवज व संशोधन सहाय्यक कनिष्ठ अभियंता या सर्व प्रकारातील हजारो कंत्राटी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
गेली 18 ते 20 वर्षे आम्ही सेवा देत आहोत. हे सर्व कर्मचारी उच्च शिक्षित आहेत. यातील काही कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे. आमची सेवा कायम करण्यासाठी गेल्या वर्षी अभ्यास गट स्थापन करण्यात आला होता. त्यानंतर याबाबत बैठक झाली नाही. त्यामुळे आमची मागणी 3 मार्चपर्यंत पूर्ण करावी अन्यथा आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा समग्र शिक्षा संघर्ष समितीने दिला होता. तरीही मागणी पूर्ण न झाल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार सेवा कायम करावी, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.