
मुंबईतील पोलीस आणि गिरणी कामगारांच्या घरांसाठी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पीडब्ल्यूडी कर्मचाऱयांच्या वरळी येथील इमारतीबाबत महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयाचाही साकल्याने पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
मुंबईत विविध ठिकाणी पोलीस वसाहती आहेत. वरळी, कुलाबा, नायगाव, माहीम आणि मरोळ येथील पोलीस वसाहतींची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. हजारो पोलीस कुटुंबीय तिथे जीव मुठीत घेऊन राहत आहेत. त्या वसाहतींच्या तत्काळ दुरुस्तीची आणि पुनर्विकासाची आवश्यकता असल्याकडे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले. या वसाहतींचे नूतनीकरण व पुनर्विकासाबाबत लवकरात लवकर बैठक घेण्यात यावी, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली.
गिरणी कामगार आणि त्यांचे वारस हक्काच्या घरांसाठी अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत. गिरणी कामगारांच्या घरांबाबत तसेच बांधून तयार असलेल्या घरांच्या लॉटरीबाबत सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा आणि गिरणी कामगारांच्या संघटनांबरोबरही त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करावी, अशीही विनंती यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली. आदित्य ठाकरे यांनी आज यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान भवनात भेट घेऊन निवेदन दिले. याप्रसंगी शिवसेना उपनेते-आमदार सचिन अहिर आणि आमदार वरुण सरदेसाई हेसुद्धा उपस्थित होते.
वांद्रे शासकी वसाहतीचा प्रश्न अधिवेशनात लावून धरणार
वांद्रे येथील शासकीय वसाहतींमधील रहिवाशांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन पुनर्विकासाबाबत पाठपुरावा करण्याची विनंती केली. वांद्रे शासकीय वसाहतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनात प्रभावीपणे लावून धरावा, असेही रहिवाशांनी यावेळी आदित्य ठाकरे यांना सांगितले. आदित्य ठाकरे यांनीही त्यांना यासंदर्भात आश्वस्त केले.