
तामिळनाडू आणि केंद्र सरकारमध्ये सध्या हिंदी आणि तामिळ असे भाषायुद्ध सुरू आहे. सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलीन यांचा कडाडून विरोध आहे. या भाषायुद्धात आता दक्षिणेकडील सुपरस्टार अभिनेते आणि नेते कमल हसन यांनी उडी घेतली आहे. केंद्र सरकारला इंडिया नाही तर हिंदीया बनवायचा आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलीन यांनी आज सीमांकनाच्या मुद्दय़ावर चर्चा करण्यासाठी तामिळनाडूच्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत कमल हसनदेखील उपस्थित होते. आज सकाळी झालेल्या या बैठकीत कमल हसन यांनीही आपली मते मांडली. केंद्र सरकार सर्वच राज्यांना हिंदी बोलण्यासाठी प्रोत्साहन देत असून बहुमताने निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप कमल हसन यांनी केला. आपले स्वप्न भारत आहे. त्यांचे स्वप्न हिंदीया आहे. दरम्यान, बैठकीनंतर हिंदी लागू करण्याबाबत आणि सीमांकनाबाबतचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आला.
केंद्र सरकारने 2026मध्ये प्रस्तावित राज्यांच्या सीमांकनाचा घाट घातला आहे. परंतु त्यामुळे तामिळनाडूसह विविध बिगर हिंदी भाषिक राज्यांवर विपरित परिणाम होईल, असे कमल हसन म्हणाले.
मोदींचे तमिळ प्रेम त्यांच्या धोरणांत का दिसत नाही – स्टॅलीन
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलीन यांनी राज्यावर हिंदी भाषा लादण्यावरून एक्सवरून जोरदार टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खरेच तमिळ भाषेबद्दल प्रेम वाटत असेल तर ते त्यांच्या धोरणांमध्ये आणि कामात का दिसत नाही, असा सवाल स्टॅलीन यांनी केला आहे. तमिळ भाषेला राज्याच्या अधिकृत भाषेचा दर्जा द्यावा. तसेच संस्कृत भाषेला मृत भाषा मानून तमिळ भाषेसाठी अधिकाधिक निधी द्यावा, अशी मागणीही स्टॅलीन यांनी केली.