
मुंबईत विविध राज्य आणि प्रांतातील लोक राहतात. विविध भाषा बोलतात. मुंबईत अनेक भाषा आहेत. घाटकोपरची भाषा गुजराती आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे असे नाही, अशी मुक्ताफळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी आज उधळली. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील विद्याविहार येथील एका कार्यक्रमात भैयाजी जोशी यांनी मुंबईतील विविधतेबाबत भाष्य केले. काwशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा त्याप्रसंगी उपस्थित होते. संघाच्या शाखेत काम करणारा प्रत्येकजण ईश्वरी कार्य करत आहे. स्वयंसेवक नावाची ही शक्ती आहे, त्या शक्तीच्या रूपाने प्रत्येकजण काम करतो, असे जोशी म्हणाले. जे स्वतःसाठी जगतात ते पशुसमान असतात आणि दुसऱ्यासाठी जगतात ते खरे आयुष्य जगतात आणि त्यांनाच मनुष्य म्हणावे, असेही ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज असे एक मात्र राजा आहेत, ज्यांना श्रीमंत योगी म्हणतात. हिंदुस्थानी परंपरेत असे महापुरुष स्वतःला अहंकारापासून मुक्त करण्यासाठी आपण जे कार्य करतो ते ईश्वराचे कार्य आहे असे म्हणतात. म्हणून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, असे शिवाजी महाराज म्हणायचे, असा दाखलादेखील भैयाजी जोशी यांनी दिला.