शिंदेंना फडणवीसांचे धक्क्यावर धक्के; एमएसआरडीसीत मिंध्यांनी नेमलेल्या कैलास जाधवांना हटवले, कमळ कोटय़ातील वैदेही रानडे यांना आणले

आमच्यात कोणताही वाद नाही, सर्व काही थंडा थंडा कूल कूल सुरू आहे, असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रोज नवा धक्का दिला जात आहे. आज त्यांनी शिंदे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) सहव्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांची उचलबांगडी केली. फ्रान्सच्या सिस्त्रा कंपनीकडून झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर फडणवीस यांनी शिंदे यांच्या अखत्यारितील एमएमआरडीए, एमएसआरडीसीमध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. त्याचाच हा भाग असल्याचे सांगितले जाते. कैलास जाधव यांच्या जागी वैदेही रानडे यांना कार्यभार देण्यात आला आहे. त्या कमळ कोटय़ातील असल्याची चर्चा आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच कैलास जाधव हे निवृत्त झाले होते. त्यानंतरही शिंदे यांनी आपले अधिकार वापरून जाधव यांची पुन्हा एमएसआरडीसीच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदावर करारावर नियुक्ती केली होती. ‘मुंडेंसाठी जसा वाल्मीक कराड तसा शिंदेंसाठी कैलास जाधव’ अशी चर्चा एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांमध्ये आजही ऐकायला येते. एमएसआरडीसीच्या तिजोरीवरच जाधव यांना शिंदेंनी बसवले होते, असा त्याचा अर्थ होता. परंतु फडणवीस यांनी त्यालाच छेद देत कैलास जाधव यांचा करार सेवा समाप्ती आदेश काढला. त्यांच्या जागी वैदेही रानडे यांना कार्यभार देण्यात आल्याचे आदेश जारी झाले आहेत.