
‘स्वराज्यासाठी धर्म न सोडता मेलो तरी बेहत्तर’ हे नुसते बोलून नाही, तर दुर्दैवाने ज्यांना ते भोगावे लागले त्या छत्रपती संभाजी महाराजांचा ‘छावा’ चित्रपट गद्दारांना दाखवायलाच पाहिजे, असा जोरदार हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मिंध्यांवर केला. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या भीतीने जे पळून गेले, त्यांनी संभाजी महाराजांकडून काहीतरी बोध घ्यायलाच पाहिजे आणि गद्दारांनी ‘छावा’ चित्रपट पाहायलाच हवा, असा टोलाही त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांनी आज विधान भवनात शिवसेनेच्या आमदारांशी चर्चा केली. त्यांच्यासोबत शिवसेना नेते-खासदार संजय राऊत हेसुद्धा होते. विधान भवनाच्या आवारात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महायुती सरकारच्या वतीने आज सर्व आमदारांसाठी ‘छावा’ चित्रपटाच्या शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यासंदर्भात त्यांना यावेळी प्रसारमाध्यमांनी विचारले. आमदारांना ‘छावा’ दाखवण्याची कल्पना मांडली त्याचे मी जाहीर अभिनंदन करतो. महायुतीच्या आमदारांना छत्रपती संभाजी महाराजांचा ‘छावा’ दाखवताय तसाच छत्रपती शिवाजी महाराजांचाही चित्रपट दाखवला पाहिजे. खासकरून जे सुरतेला पळून गेले त्यांना स्वराज्यासाठी सुरत लुटणारा आपला राजा कसा होता त्यांचे शौर्यही समजले पाहिजे, अशी चपराक उद्धव ठाकरे यांनी मिंध्यांना लगावली.
विरोधी पक्षनेतेपदावर रीतसर उत्तर आल्यावरच बोलू
विरोधी पक्षनेतेपद महाविकास आघाडीला द्यायला विधानसभा अध्यक्ष सकारात्मक नाहीत अशा बातम्या येत असल्याचे यावेळी प्रसारमाध्यमांनी सांगितले. त्यावर, बातम्यांवर मी का बोलू? शिवसेनेने रीतसर प्रस्ताव दिला आहे. अध्यक्षांकडून रीतसर उत्तर आल्यानंतरच मी बोलेन, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
आता कळेल कोणाचे नळ कोणाबरोबर जोडलेत
यवतमाळमधील अमृत योजना नळजोड प्रकल्पात घोटाळा झाला आहे. त्यासंदर्भात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करण्यात आले असल्याचे वृत्त आहे. त्याबाबत माध्यमांनी विचारले असता, आता कळेल कोणाचे नळ कोणाबरोबर जोडलेत, असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.
अबू आझमींचे कायमचे निलंबन करा
अबू आझमी यांना कायमचे निलंबित करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या दैवतांबद्दल अपशब्द काढणारा कुणीही असला तरी त्याचा मुलाहिजा न ठेवता अद्दल घडवली पाहिजे. आझमींचे निलंबन किती मिनिटांसाठी, तासांसाठी, दिवसांसाठी केले मला माहीत नाही; पण कुणाचीही पुन्हा असे बोलण्याची हिंमत होता कामा नये, अशी कारवाई सरकारने करावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.