मंत्री जयकुमार गोरे यांच्या कॅरेक्टर सर्टिफिकेटचे काय? फडणवीस म्हणतात, पीए… पीएस आणि ओएसडी यांचे चारित्र्य स्वच्छ हवे!

महायुती सरकारमध्ये मंत्र्यांचे पीए, पीएस आणि ओएसडी यांचे चारित्र्य स्वच्छ हवे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. मंत्री कार्यालयात नियुक्ती करताना फडणवीस जसे संबंधितांचे कॅरेक्टर तपासून पाहतात तसे मंत्रिमंडळात मंत्र्यांचा समावेश करताना का केले नाही. मंत्री जयकुमार गोरे यांच्या कॅरेक्टर सर्टिफिकेटचे काय? शिक्षेला स्थगिती मिळालेले माणीकराव कोकाटे, चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, संजय राठोड मंत्रिमंडळात कसे? अशी चर्चा सर्वत्र आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘लाडके मंत्री’ असणारे जयकुमार गोरे स्वतःचे नग्न फोटो एका महिलेला पाठविल्याचे उघडकीस आले आहे. 2016 पासून ते संबंधित महिलेला त्रास देत असून या प्रकरणात  जयकुमार गोरे यांना अटकही झाली होती. ते दहा दिवस जेलमध्ये होते. विकृत मानसिकतेच्या गोरे यांचा मंत्रिमंडळात समावेश करताना याकडे दुर्लक्ष का? केले. आमदार गोरे यांच्यावर फसवणुकीचे देखील आरोप असून न्यायालयात देखील त्यांच्या विरुद्ध खटले सुरू आहेत. मंत्र्याच्या पीए, पीएस आणि ओएसडी यांची नियुक्ती करताना ज्या प्रकारे चाळणी लावून तपासणी केली जात आहे. त्या प्रकारे मंत्री गोरे यांच्या चारित्र्याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

माणिकराव कोकाटेंनी सदनिका लाटली

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कागदपत्रात फेरफार करून शासकीय कोटय़ातील सदनिका लाटली. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. तूर्तास या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.

हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ 35 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात ईडीच्या रडारवर आहेत. मुश्रीफ यांच्याविरोधात मनी लाँडरिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे. .

सरनाईकांवर भ्रष्टाचाराचे आरोप

शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. भाजपच्या नेत्यांनीच केलेल्या आरोपांमुळे सरनाईक यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. एनएसईल प्रकरणात सरनाईक यांची संपत्तीदेखील जप्त करण्यात आली होती.

संजय राठोड गायरान जमीन घोटळा

शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांनी गायरान जमीन वाटपात घोटळा केल्याचा आरोप होत आहे. मंत्रीपदाचा गैरवापर करून नवी मुंबई येथील मोक्याचा भूखंड लाटल्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.

गोरे यांची काळी कृत्ये

जयकुमार गोरे यांनी साताऱ्यातील एका महिलेला 2016 मध्ये आपले नग्नावस्थेतील फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले होते. त्यात गोरे यांना अटक होऊन दहा दिवस तुरुंगात काढावे लागले होते. तुरुंगातून सुटल्यानंतर पीएमार्फत पीडित महिलेवर खंडणीची तक्रार करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्र्यांनी घेतली भाजप मंत्र्यांची शाळा मुंडे प्रकरणाच्या धडय़ावर चर्चा

धनंजय मुंडे प्रकरणातून धडा घ्या आणि वर्तन सुधारा असे आदेश फडणवीस यांनी भाजप मंत्र्यांना दिले. मुंडे यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर भाजप मंत्र्यांची बैठक झाली. यावेळी फडणवीस यांनी सार्वजनिक वर्तणुकीबाबत खडे बोल सुनावले. तुम्ही जनतेचे मंत्री आहात. त्यामुळे लोकांशी बोलताना भाषा आणि वर्तणूक चांगली ठेवा. मोबाईलवर बोलताना तारतम्य ठेवा. चुकीचे वर्तन मंत्रीपदावर गंभीर परिणाम करेल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.