
चिन्ह पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेले ‘गायतोंडे ः बिटवीन टू मिरर्स’ या पुस्तकाचे छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन करण्यात आले. यावेळी पद्मभूषण डॉ. नंदकिशोर लाड, पद्मश्री डॉ. सरयू दोशी, डॉ. फिरोज गोदरेज, प्रयाग शुक्ला, पद्मश्री कुमार केतकर आणि ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. ‘गायतोंडे ः बिटवीन टू मिरर्स’ हे पुस्तक म्हणजे झेन दृश्यांच्या स्वरूपातील संवेदनशील शांततेचे संकलन या स्वरूपात चित्रकार वासुदेव संतू गायतोंडे यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे.
1924 मध्ये महाराष्ट्रात जन्मलेल्या गायतोंडे यांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात श्रद्धांजली वाहण्याचे कार्य हे पुस्तक करते. चिन्ह मासिकाचे संस्थापक-संपादक सतीश नाईक यांच्या संकल्पनेतून साकार झालेले हे पुस्तक गायतोंडे यांच्या कलात्मक प्रवासाचे, वैयक्तिक जीवनाचे आणि झेन बौद्ध धर्माच्या त्यांच्या आध्यात्मिक शोधाचे वर्णन करते. ‘बिटवीन टू मिरर्स’ ही टॅगलाइन त्यांच्या कामांचे सूक्ष्म बारकावे आणि त्यांच्या गुरूंशी झालेल्या त्यांच्या तात्त्विक संभाषणाचे वर्णन करणारी एक चिंतनशील स्वरूपाची ओळ आहे.
पुस्तकात 74 दुर्मिळ छायाचित्रे
पुस्तकात 1 लाखाहून अधिक शब्दांचा मजकूर, गायतोंडे यांची 120 चित्रे, 74 दुर्मिळ छायाचित्रे, गायतोंडे यांचे विविध शैलीतील 20 हून अधिक खास रेखाचित्रे, त्यांच्या जवळच्या ओळखीच्या 12 व्यक्तींचे निवेदनपर लेख आणि अनेक पूर्वप्रकाशित लेख व मुलाखती आहेत. त्यामुळे हे पुस्तक कलाप्रेमी, चित्र संग्राहक आणि तरुण कलाकारांसाठी एक अमूल्य संदर्भग्रंथ बनले आहे. या पुस्तकाची किंमत 12,600 रुपये असून चिन्ह पब्लिकेशन्स यांनी 31 मार्चपर्यंत हे पुस्तक 9,000 रुपये या विशेष सवलतीच्या किमतीत उपलब्ध करून दिले आहे. पुस्तक मागवण्यासाठी https://forms.gle/Wq6dRSECD4WfWWMo8 या संकेतस्थळाला भेट द्या.