
आर्थिकदृष्टय़ा अतिशय सुदृढ आणि उत्कृष्ट बँकांच्या संदर्भात रिझर्व्ह बँकेने काही आर्थिक निकष निश्चित केले आहेत. या सर्व निकषांची राज्य सहकारी बँक पूर्तता करते. हे लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेला तब्बल 500 कोटींचे दहा वर्षांच्या दीर्घ मुदतीचे बॉण्ड वितरीत करण्यास नुकतीच परवानगी दिली आहे.
राज्य बँकेला गेल्या 5 वर्षांपासून सतत उच्चांकी नफा होत असून गेल्या तीन वर्षांत म्हणजेच 2022 मध्ये 603 कोटी रुपये तर 2023 मध्ये 609 कोटी आणि 2024 मध्ये तब्बल 615 कोटी रुपयांचा नफा झाला, अशी माहिती राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. राज्य बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाणही रिझर्व्ह बँकेच्या आदर्श प्रमाणाच्या तसेच राष्ट्रीय मानांकनापेक्षा कितीतरी पटीने अधिक म्हणजेच 16.34 टक्के आहे, असे अनास्कर यांनी सांगितले.
5 हजार कोटींहून अधिक नेटवर्थ
देशात सर्वाधिक म्हणजेच 5 हजार कोटी रुपयांहून अधिक नेटवर्थ असलेली राज्य बँक ही एकमेव सहकारी बँक आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या परवानगीनुसार राज्य बँकेतर्फे ऑफर प्रक्रिया लवकरच सुरू होत असून यातील गुंतवणुकीसाठी कमीत कमी वैयक्तिक 10 हजार संस्थात्मक आणि 50 हजार इतकी मर्यादा ठेवण्यात येणार आहे. ही गुंतवणूक राज्य बँकेच्या भांडवलात जमा होणार असल्याने राज्य बँकेचा निधी आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. यामुळे राज्य बँक सहकारातील त्रिस्तरीय पतरचना आणखी मजबूत होण्यास मदत होणार असून याचा फायदा समाजातील सर्व घटकांना होईल, असा विश्वास प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केला.