कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा! शिक्षकांचे आज राज्यव्यापी आंदोलन

1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा, आयटी शिक्षकांच्या समायोजनेबाबत शासनाने अध्यादेश काढावा अशा विविध मागण्यांसाठी  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी राज्यभरात उद्या 6 मार्च रोजी धरणे सत्याग्रह आंदोलन करणार आहेत. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा 12 मार्च रोजी राज्यभर आंदोलनाचा इशारा शिक्षकांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या नियामक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली त्यावेळी सरकारकडे विविध मागण्या करूनही त्याची पूर्तता न झाल्याने महासंघाने राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. आयटी विषयाच्या शिक्षकांना वेतनश्रेणी देण्यासाठी त्यांचे समायोजन करणे,  1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत असलेल्या अर्धवेळ, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित सेवेत असलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे व इतर मागण्या आहेत.

शिक्षण मंत्र्यांचे आश्वासन हवेत विरले

शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्याबाबत स्वतंत्र बैठक घेऊ असे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन हवेतच विरले असून अद्याप बैठक न घेतल्यामुळे शिक्षकांमध्ये असमाधानाचे वातावरण आहे.