
बीड, परभणी, लातूर, जालना येथे माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडल्या. विकासाला मानवी चेहरा पाहिजे, पण माणसालाच जनावरासारखे मारले जात असेल तर हा विकास कोणासाठी करायचा, असा सवाल करत अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी आज सरकारला घरचा आहेर दिला. राज्यात घडणाऱया क्रूर घटना रोखण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनीच आता पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली.
आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा झाली. या चर्चेत सहभागी होताना भुजबळ यांनी बीड, परभणी, लातूर, जालना येथे घडलेल्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्यांनी आवाज उठवला त्यांनी परभणीच्या घटनेत पोलिसांना माफ करण्याची भूमिका घेतली. परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू पावलेला सोमनाथ सूर्यवंशी हा दलित, मागासवर्गीय समाजाचा होता म्हणून पोलिसांना माफ करायचे काय, असा सवाल करत भुजबळ यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला.